Published On : Thu, Oct 29th, 2026
By Nagpur Today Nagpur News

महायुती सरकारच्या परतीचे दिवस सुरू; विजय वडेट्टीवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला

ओबीसी आरक्षण, ईव्हीएम आणि महायुतीतील वादांवरही टीका
Advertisement

नागपूर : विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप आणि महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. या निकालाने सत्तेच्या नशेत असलेल्या भाजपचे डोळे उघडले असून, तरुण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत असलेल्या असंतोषाचे प्रतिबिंब निवडणुकीत दिसल्याचा दावा त्यांनी केला. ‘महायुती सरकारच्या परतीचे दिवस सुरू झाले आहेत. संघभूमीतूनच युवकांनी भाजपला गो बॅकचा नारा दिला,’ असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.

महाविकास आघाडीने तीन पदवीधर मतदारसंघांत विजय मिळवल्याचा उल्लेख करत त्यांनी, ज्या मतदारसंघांत मतदान अधिक झाले, तिथे महाविकास आघाडीला यश मिळाले, तर कमी मतदान असलेल्या मतदारसंघांत महायुती विजयी झाली, असे म्हटले. जनतेतील असंतोष आणि सत्तेच्या अहंकाराविरोधातील भावना या निकालातून व्यक्त झाल्याचेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्विट डिलीट करण्याची वेळ आल्याचा टोला लगावत त्यांनी दोघांवरही टीका केली.

महायुतीतील वादावर ‘नांदा सौख्यभरे’चा टोला-
महायुतीतील घटक पक्षांमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर बोलताना वडेट्टीवार यांनी, ‘नांदा सौख्यभरे’, एवढेच आपण सांगू शकतो, अशी उपरोधिक प्रतिक्रिया दिली. हे पक्ष केवळ सत्तेत टिकून राहण्यासाठी एकत्र आले असून, आता त्यांच्यात ‘हमरीतुमरी’ सुरू असल्याचे ते म्हणाले.

ओबीसी आरक्षणावरून सरकारला धारेवर-
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य करताना वडेट्टीवार यांनी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधित्वावर परिणाम होत असून, ग्रामपंचायतींमध्ये त्यांच्या पक्षाच्या सुमारे ६० टक्के जागा कमी झाल्याचा दावा त्यांनी केला. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही ओबीसी समाजाचे नुकसान होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

Advertisement

सरकारने आरक्षण कमी होणार नसल्याचे ठामपणे सांगितले होते; मात्र, या प्रकरणात अंतिम तोडगा निघालेला नसून अनेक याचिका प्रलंबित असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. निवडणुकांना आमचा विरोध नाही, परंतु ओबीसी समाजाला त्यांचा हक्काचा आरक्षण कोटा मिळालाच पाहिजे. ओबीसींचे प्रतिनिधित्व कमी करून निवडणुका घेतल्या जात असतील, तर सरकारची भूमिका ओबीसीविरोधी असल्याची टीकाही त्यांनी केली.

ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची मागणी-
निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करत वडेट्टीवार यांनी सर्व निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेण्याची मागणी पुन्हा केली. ईव्हीएमबाबत जनतेच्या मनात असलेला संभ्रम दूर करण्यासाठी सरकारने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले. असा निर्णय घेतल्यास मोदी सरकारला मोठा राजकीय फटका बसेल, असा दावाही त्यांनी केला.

नितेश राणेंवर टीका; वंजारींच्या विजयाचे श्रेय मतदारांना-
भाजप आमदार नितेश राणे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार यांनी त्यांचे राजकीय ज्ञान कमी असल्याची टीका केली. नागपूर पदवीधर मतदारसंघातील निकाल हा भाजपविरोधी मतदानाचा परिणाम असल्याचे ते म्हणाले. नितेश कराळे नसते, तर अभिजित वंजारी पहिल्याच फेरीत निवडून आले असते, असा दावाही त्यांनी केला.

अभिजित वंजारी यांनी विधान परिषदेत सातत्याने तरुण, बेरोजगार आणि जनतेचे प्रश्न मांडले. त्यामुळे त्यांची गरज मतदारांनी ओळखली आणि त्यांना विजय मिळवून दिला, असे वडेट्टीवार म्हणाले. हा विजय धनशक्ती आणि सत्तेच्या माजाविरुद्ध जनशक्तीने दिलेला कौल असल्याचे त्यांनी नमूद केले.

इंडिया आघाडीच्या आंदोलनाचा इशारा-
देशातील लोकशाही वाचवण्यासाठी राहुल गांधी आणि इंडिया आघाडीने लढा उभारल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. एक तारखेला दिल्लीत होणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याची मागणी करत इंडिया आघाडी महाभियोगाची तयारी करत असल्याचेही त्यांनी सांगितले. निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि लोकशाही संस्थांच्या स्वायत्ततेच्या मुद्द्यावर हा लढा सुरूच राहील, असे ते म्हणाले.

एकूणच, विधान परिषद निवडणुकीतील निकाल हा महायुती सरकारविरोधातील जनतेच्या असंतोषाचा संकेत असल्याचा दावा करत वडेट्टीवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, ओबीसी आरक्षण आणि ईव्हीएमच्या मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.