Published On : Sat, Oct 24th, 2020

टेंबली प्रकरणात महाविकास आघाडी सरकारचा असंवेदनशील चेहरा उघड : भाजपा प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम

Advertisement

पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा;‘त्या’ पोलिसांना बडतर्फ करा

अमरावती. अमरावती जिल्ह्यातील टेंबली या गावात एका दलित महिलेची दिशाभूल करून दोन युवकांनी बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई न करता आरोपींना अभय देण्याचा प्रयत्न केला. ज्या जिल्ह्यात हे दुष्कृत्य घडले त्या जिल्ह्याच्या पालकमंत्री महिला आहेत. दुसरीकडे राज्याच्या उपराजधानीत राहणारे राज्याचे ऊर्जा मंत्री दलितांच्या अत्याचाराविरोधात हजारो किमी उत्तर प्रदेशात जाऊन आंदोलन करतात तर दुसरीकडे गृहशहरपासून १५० किमीच्या अंतरावरील घटनेची दखलही घेत नाही. राज्यातील दलितांच्या अत्याचाराबाबत हे नेहमीच घडत येत आहे. अमरावतीतील टेंबली प्रकरणात राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारचा असंवेदनशील चेहरा आज उघड पडला आहे, असा घणाघात करीत एवढ्या गंभीर अत्याचाराची साधी दखलही न घेणाऱ्या असंवेदनशीन सरकारमधील अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनपा पक्षाचे प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी केली आहे.

Gold Rate
09 May 2025
Gold 24 KT 96,800/-
Gold 22 KT 90,000/-
Silver/Kg 96,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अमरावती जिल्ह्यातील धारणी जवळील टेंबली गावात घडलेल्या दुकृत्याची बळी ठरलेल्या पिडीतेला न्याय मिळवून देण्यासाठी शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) भाजपा प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी घटनास्थळी भेट दिली. महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात टेंबली येथे धरणे आंदोलनही करण्यात आले.

शुक्रवार १६ ऑक्टोबर रोजी अमरावती जिल्ह्यातील धारणीपासून जवळच असलेल्या टेंबली या गावी एक महिला अनेक तास बसची वाट पाहत होती. सदर महिलेची दिशाभूल करीत पुढे बस असल्याचे सांगत दोन युवकांनी महिलेला मोटारसायकलवर बसविले. त्यानंतर त्यांनी महिलेला धारणीहून टेंबली जवळच्या शेतात नेऊन मारहाण केली. दोघांनी बळजबरीने तिच्या तोंडात दारू ओतून तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. दहा दिवसांपूर्वी या महिलेच्या तरुण मुलाचे निधन झाले. त्या दु:खात असलेल्या या महिलेला नराधमांच्या पाशवी दुष्कृत्याला सामोरे जावे लागले. या गंभीर प्रकाराची तक्रार करायला गेले असता स्थानिक पोलिसांद्वारे टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवाय महिलेला तिच्या मुलीसह तब्बल दोन दिवस अज्ञात स्थळी ठेवण्यात आले होते.

संपूर्ण प्रकरणाची भाजपा अमरावती जिल्हाध्यक्षा निवेदिताताई व प्रवक्ते शिवरायजी कुळकर्णी यांना माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना अवगत केले. पोलिसांद्वारे आरोपींवर ॲस्ट्रासिटी अंतर्गत गुन्हे दाखल करणे आवश्यक होते, याशिवाय कलम ३७६/२ अंतर्गत कारवाई करणे हे सुद्धा गरजेचे होते. परंतू पोलिसांनी या पद्धतीची कोणतिही कार्यवाही केली नाही. याउलट भाजपच्या महिला नेत्यांना धमकावण्याचे षडयंत्र देखील केले. अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री स्वत: एक महिला आहेत. त्यांच्या नेतृत्वातील जिल्ह्यात एखाद्या दलित महिलेवर अत्याचार होत असेल आणि पालकमंत्री काहीही करणार नसतील, पोलिस प्रशासन असे संशयाच्या भूमिकेत काम करणार असेल, महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री, मंत्रीमंडळातील दलित मंत्री, सामाजिक न्याय मंत्री यांनी कोणत्याही पद्धतीची मदत दूरच घटनेची साधी दखलही घेत नसतील तर हा राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा दलितांप्रती असलेला असंवेदनशील चेहरा उघड पडला आहे, असे सांगत राज्य सरकारच्या कृत्याबद्दल तीव्र निषेधही भाजपा प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केला.

पिडीत महिलेच्या परिवाराला तात्काळ सानुग्राह मदत करावी. त्यांना संरक्षण द्यावे तसेच कारवाई करण्यासाठी ज्या पोलिसांनी टाळाटाळ केलेली आहे, त्या पोलिसांना तात्काळ प्रभावाने सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी लावून धरली.

महाराष्ट्र सरकारच्या मंत्रीमंडळातला एखादा मंत्री हजारो किमी लांब उत्तरप्रदेशच्या घटनेचा निषेध करण्यासाठी जाऊ शकतो. परंतू महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरपासून १५० किमी अंतरावर खेड्यावर दलित महिला सुरक्षित नाही. अशी परिस्थिती असतानाही महाराष्ट्रातील मंत्री त्या ठिकाणी जाऊ शकत नसेल, अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री त्याठिकाणी जाऊ शकत नसेल तर कोणत्या नाकाने उद्धव ठाकरेंचे सरकार उत्तरप्रदेशच्या सरकारला प्रश्न विचारत आहे? असा सवालही ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी केला आहे.

Advertisement
Advertisement