Published On : Wed, Jan 15th, 2020

वीज क्षेत्रात महावितरणचे काम उल्लेखनीय

राजस्थानचे ऊर्जा मंत्री ना. बी. डी. कल्ला यांच्याकडून कौतुक

नागपूर: वीज क्षेत्रात महावितरणचे काम उल्लेखनीय असल्याचे कौतुक राजस्थानचे ऊर्जा मंत्री नामदार बी. डी. कल्ला यांनी आज नागपूर येथे केले. ना. कल्ला आज (दिनांक १४ रोजी ) येथे आले असता बिजली नगर विश्राम गृहात त्यांनी महावितरण आणि महानिर्मिती अधिकाऱ्यांशी चर्चा करून महाराष्ट्रात ऊर्जा क्षेत्रात सुरु असलेल्या विविध कामांची माहिती घेतली.

महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी सर्वप्रथम राजस्थानचे ऊर्जा मंत्री बी. डी. कल्ला यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी महावितरणचे एकूण वीज ग्राहक, विजेची मागणी, वितरण हानी कमी करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

महावितरणच्या वतीने वीज ग्राहकांना माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून देण्यात येत असलेल्या सुविधेची माहिती ना. कल्ला यांनी आवर्जून घेतली. महावितरणने सुरु केलेल्या अनेक योजनांचे त्यांनी कौतुक केले. सोबतच राजस्थान वीज मंडळाचे कामकाज कोणत्या पद्धतीने चालते याची माहिती महावितरण आणि महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांना दिली. महानिर्मितीच्या वतीने सुरु असलेल्या विविध प्रकल्पाची माहिती मुख्य अभियंता राजकुमार तासकर, अनंत देवतारे, अधीक्षक अभियंता मिलिंद रामटेके यांनी दिली.