Published On : Tue, Jul 17th, 2018

मुहाने एकत्र येऊन आनंद व्दिगुणीत करण्याचा क्षण म्हणजे उत्सव संस्कृती – विनोद तावडे

Advertisement

Vinod Tawde

Nagpur: समुहाने एकत्र येऊन आनंद व्दिगुणीत करण्याचा क्षण म्हणजे उत्सव संस्कृती तर आपल्या देवता किंवा ग्रामदेवता यांना साक्षी मानुन त्यांच्या आराधनेसाठी यात्राचे नियेाजन म्हणजेच एक प्रकारे पर्यटन करणे होय असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी केले. दर्शनिका विभागाव्दारे राज्य गॅझेटिअर मालिकेतील महाराष्ट्र : यात्रा व उत्सव (विदर्भ विभाग) या पहिल्या खंडाचे प्रकाशन श्री. तावडे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, आमदार सीमा हिरे, विनोदसिंह ठाकूर, डॉ.दिलीप बलसेकर, सायली पिंपळे, विजय गुळगुळे आदी उपस्थित होते.

श्री. तावडे म्हणाले, संस्कृती, भाषा व वेशभूषा आदिंमध्ये विविधता असलेल्या महाराष्ट्रात अनादी कालखंडापासून सण, यात्रा व उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. अशा या यात्रा व उत्सवामुळे आपली परंपरा व संस्कृती एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत संक्रमित होते व या मातीशी व आपल्या संस्काराशी असलेले नाते दृढ होते. याचे महत्व जाणून दर्शनिका विभागाव्दारे राज्य गॅझेटिअर मालिकेतील महाराष्ट्र : यात्रा व उत्सव (विदर्भ विभाग) हा पहिला खंड प्रकाशित करण्यात येत आहे.

मुलत: विदर्भातील एकूण 11 जिल्ह्यातील बहुतांश यात्रांची नोंद या खंडात प्रत्यक्ष सर्व्हेक्षणाव्दारे माहिती संकलित करुन ती एकत्रित स्वरुपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या खंडात काही प्रतिनिधिक स्वरुपाच्या महत्वाच्या यात्रांचा समावेश सविस्तर माहिती देवून केला आहे. गॅझेटिअर विभागाकडून जिल्हा व राज्य गॅझेटिअर मराठी इंग्रजी भाषेतून विविध सहा मालिकेंतर्गत ग्रंथ प्रकाशित केले जातात.

याचाच एक भाग म्हणून विदर्भानंतर यात्रा व उत्सव कोकण व तद्नंतर महाराष्ट्राच्या इतरही विभागाचे खंड काढण्यात येणार आहेत. विदर्भाच्या खंडाचे लेखनाचे काम नागपूर येथील निवृत्त प्राध्यापिका डॉ.शैलजा देवगावकर यांनी पूर्ण केले आहे. आदिवासी बोलीभाषा, विशेषत: माडिया गोंड, कोरकू लोकसाहित्याच्या अभ्यासक तर विदर्भातील लोकपरंपरा या विषयाच्या व्यासंगी म्हणून त्या सर्व परिचित आहेत.

एकूण 250 पृष्ठांच्या या ग्रंथात यात्रा व उत्सवा संबंधिची माहिती व 42 रंगीत छायाचित्रांचा समावेश स्वतंत्रपणे करण्यात आला आहे. या छायाचित्रात यात्रा व उत्सवांचे दृश्य तर काही ठिकाणी ज्या देवतांमुळे किंवा उत्सवमूर्तीमुळे तेथील यात्रा व उत्सव साजरे करण्यात येतात त्यांचे किंवा त्या स्थळांचे, मंदिराचे महत्व जाणून असे काही प्रतिनिधिक छायाचित्रे देण्याचा प्रयत्न केला आहे. या ग्रंथात जिल्हावार माहिती देवून त्या-त्या जिल्हाचा नकाशाही देण्यात आला आहे.