Published On : Sun, Sep 3rd, 2017

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारातून महाराष्ट्राला अधिक लाभ मिळेल! मुख्यमंत्र्यांकडून नवीन मंत्र्यांचे अभिनंदन

Advertisement

मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या विस्तारात शपथ घेतलेल्या सर्व मंत्र्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले असून या विस्तारामुळे महाराष्ट्राला आणखी लाभ मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.

श्री. नितीन गडकरी यांच्याकडे जलसंपदा खात्याचा पदभार देण्यात आल्याने राज्यातील अपूर्ण व प्रलंबित सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याच्या कामाला आता आणखी गती देता येईल. तसेच महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणारे पियुष गोयल यांच्याकडे रेल्वे खात्याचा पदभार आल्याने राज्यातील रेल्वे प्रकल्पांना सुद्धा अधिक गती मिळेल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारचे राज्याला सर्वच क्षेत्रात भरीव सहकार्य मिळत आहे. श्री. सुरेश प्रभू यांनी रेल्वेमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या रेल्वे प्रकल्पांना चांगली गती दिली. आता श्री. पियुष गोयल त्याला अधिक पुढे नेतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. तसेच श्री. सुरेश प्रभू यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभारही मानले आहेत.

श्रीमती निर्मला सीतारामन यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाचा पदभार देऊन प्रधानमंत्र्यांनी महिलांचा सन्मान उंचावला आहे. देशाच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा महिलेकडे संरक्षण मंत्रीपद आले आहे. त्यामुळे निर्मला सीतारामन यांचेही आपण विशेष अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देतो, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.