पुणे: महाराष्ट्र राज्याला देशाचं पहिलं बेघर मुक्त राज्य बनवण्याची दिशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवली आहे. याबाबत त्यांनी मोठा निर्णय घेत प्रशासनाला युद्धपातळीवर काम करण्याचं आवाहन केलं आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यातील यशदा इथे आयोजित पंचायत राज राज्य स्तरीय कार्यशाळेत बोलताना सांगितलं की, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) च्या माध्यमातून राज्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि केंद्र सरकारने १० लाख अतिरिक्त घरांच्या मंजुरीला मान्यता दिली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “प्रत्येक गरजूला छत मिळवून देणं हे आपलं संकल्प आहे. आता महत्त्वाचं आहे की, स्वीकृत घरांसाठी भूमीची उपलब्धता सुनिश्चित केली जावी आणि प्रत्येक कुटुंब बेघर राहू नये याची काळजी घेतली जावी.”
त्यांनी प्रशासनाला जनमंचावर आधारित व तंत्रज्ञानसंपन्न पद्धतीने कार्य करण्याचे निर्देश दिले. आत्ताच आपल्याकडे तंत्रज्ञान आणि संसाधनं आहेत, फक्त त्याचा योग्य वापर करून आम्हाला इतर राज्यांच्या यशस्वी मॉडेल्सपासून शिकून त्याची अंमलबजावणी करावी लागेल, असं फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री सूर्यघर योजना अंतर्गत नवीन घरांमध्ये सौर ऊर्जा सुविधा सुरू करण्याची शिफारस केली. यामुळे केवळ पर्यावरणीय फायदे होणार नाहीत, तर रोजगाराच्या नवीन संधीसुद्धा निर्माण होतील, असे ते म्हणाले.
कार्यशाळेत ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे, राज्य मंत्री योगेश कदम, प्रधान सचिव एकनाथ डवले, यशदाचे महानिदेशक निरंजन सुधांशु आणि मुख्यमंत्री सचिव श्रीकर परदेशी हे सर्व उपस्थित होते. फडणवीस यांनी शेवटी सांगितलं की, या योजनांद्वारे केवळ घरांची निर्मिती होणार नाही, तर महाराष्ट्र एक असे मॉडेल बनेल जे देशभरात आदर्श म्हणून दाखवता येईल.