नागपूर: नागपूर शहरातील गुन्ह्यांमध्ये सातत्याने होणारी वाढ आणि कायदा-व्यवस्थेची चिंताजनक स्थिती लक्षात घेत विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमधील वाढत्या गुन्ह्यांच्या संदर्भात राज्य सरकारवर टीका केली.
वडेट्टीवार म्हणाले, “ज्या शहरात राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री राहतात, तिथेच गुन्ह्यांची संख्या भयंकर वाढत आहे. सरकारला याबाबत काहीही लक्ष नाही. जर वेळेत गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवले नाही, तर स्थिती हाताबाहेर जाऊ शकते.” त्याचबरोबर, वडेट्टीवार यांनी बहुचर्चित शिक्षक भरती घोटाळ्याचा मुद्दा देखील उपस्थित केला. त्यांनी या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची आणि दोषींवर कडक कारवाईची मागणी केली.
इतिहास विषयाच्या NCERT पुस्तकात काही अध्यायांमध्ये केलेल्या बदलांवरही वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले, इतिहास हा भूतकाळातील घटनेचा पुरावा आहे. कोणताही देश किंवा काळाचा इतिहास बदलता येत नाही. वडेट्टीवार यांनी सरकारवर जातीय व धार्मिक भेदभाव निर्माण करण्याचा आरोप करत विरोध केला.