भिलार (महाबळेश्वर): देशातील पहिले आणि एकमेव पुस्तकांचे गाव भिलार सारख्या शाखा राज्यातील अनेक गावांमध्ये व्हाव्यात आणि हळूहळू आपले राज्यच ‘पुस्तकांचे राज्य’ व्हावे अशी अपेक्षा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केली. पुस्तकच आपली संपत्ती आहेत त्यामुळे आपण समृद्ध होऊ शकतो असेही त्यांनी सांगितले.
देशातील पहिले आणि एकमेव पुस्तकांचे गाव अर्थात भिलार येथे वर्षपूर्तीनिमित्ताने खुले रंगमंच आणि 5 नवीन कुटुंबीयांकडे दालनाच्या उद्घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते शुक्रवारी (दि. 4) बोलत होते.
भिलारसारख्या पुस्तकांच्या गावाच्या राज्यभर शाखा व्हाव्यात असे सांगताना सुभाष देसाई म्हणाले, कारण पुस्तकच आपली संपत्ती आहे. राज्य आर्थिक दृष्ट्या कसे आहे काय आहे या विचारात ना पडता आपण पुस्तकांमुळे समृद्ध झालो तर इतर अनेक प्रश्नही सुटतील. अशी गावच अनुभव संपन्न करणारी, समृद्ध करणारी ठरतील अशी खात्रीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच अशा प्रकल्पांसाठी उद्योग खात्याकडून जी काही मदत लागेल ती आम्ही नक्कीच देऊ असे आश्वासनही त्यांनी दिले.
विनोद तावडे म्हणाले की, अशा प्रकल्पांसाठी मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्यांकडे झोळी पसरावी लागते. तीच मागणी आम्ही उद्योग खात्याकडे केली आणि देसाईनी लगेच त्याला मंजुरी देत त्यांच्या माध्यमातून आज हा खुला रंगमंच तयार झाला आहे. जसे वेडिंग डेस्टिनेशन्स असतात तसे पुस्तक प्रकाशनाचे डेस्टिनेशन्स का नसावे या विचाराने हा रंगमंच बांधण्यात आला आहे.