
नागपूर,: बारा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर महसूलमंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाचे शुक्रवारी भावपूर्ण वातावरणात कोराडी तलावात विसर्जन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्रावर निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीतून राज्याला बाहेर काढावे, शेतकऱ्यांना बळ द्यावे आणि सर्वसामान्य नागरिकांना सुखी ठेवावे, अशी प्रार्थना बावनकुळे यांनी गणरायाच्या चरणी केली.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले, “गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे. सध्या महाराष्ट्रात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढावे, शेतकऱ्यांना बळ द्यावे आणि राज्य सुखी-समृद्ध ठेवावे, अशी प्रार्थना बाप्पाच्या चरणी केली आहे.”
दुष्काळसदृश परिस्थितीत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकारी परिस्थितीचा आढावा घेत असून प्रशासनाच्या माध्यमातून पिकांच्या नुकसानीसह विविध बाबींची नोंद घेतली जात असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
“शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कुठेही चूक होऊ नये आणि कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी काळजी घेतली जात आहे,” असे ते म्हणाले.
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती जिल्हानिहाय परिस्थितीचा आढावा घेऊन पीक नुकसान, पाणीटंचाई, चारा उपलब्धता आणि आवश्यक मदतीबाबत उपाययोजनांची शिफारस करत आहे. समितीच्या नियमित बैठका घेण्यात येत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली दुष्काळसदृश परिस्थितीबाबत लवकरच आवश्यक शासन निर्णय घेण्यात येतील आणि त्यानंतर शेतकऱ्यांना मदत देण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
“दुष्काळाच्या या परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने मदत केली जाईल. पंचनामे, पाहणी आणि प्रशासनाकडून मिळणाऱ्या अहवालांच्या आधारे कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
दरम्यान, दुष्काळसदृश परिस्थितीवरून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांवरही बावनकुळे यांनी भाष्य केले. “अशा संकटाच्या काळात दुष्काळावर राजकारण करणे योग्य नाही. विरोधकांनी राजकारण न करता सरकारसोबत येऊन शेतकऱ्यांसाठी काम करावे,” असे ते म्हणाले.
बारा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर बाप्पाला निरोप देताना बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि राज्याच्या सुख-समृद्धीसाठी पुन्हा एकदा प्रार्थना केली.
“गणपती बाप्पा आम्हा सर्वांना या दुष्काळसदृश परिस्थितीतून बाहेर काढो आणि महाराष्ट्र पुन्हा सुखी, समृद्ध व संपन्न होवो,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.






