Published On : Sun, Jun 16th, 2019

परीणय फुके यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

Advertisement


गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार आज रविवारी अखेर पार पडला आहे. १३ आमदारांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला. शिवसेनेनं उपमुख्यमंत्रीपद नाकारल्यामुळे त्यांना दोन कॅबिनेट मंत्रीपदे देण्यात आली आहेत. उद्यापासून (सोमवार) राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत असून त्याआधी हा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार उरकण्यात आला.

लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन कमळ हाती घेणारे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, मुंबई महापालिका आणि आताच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळवून देण्यास हातभार लावणारे आशिष शेलार आणि बीडमधील शिवसेना आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी सर्वात आधी शपथ घेतली.

विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर होणाऱ्या फडणवीस सरकारच्या या अखेरच्या मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. विदर्भातून अनिल बोंडे, डॉ. संजय कुटे, प्रा. डॉ. अशोक उईके यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे विश्वासू परिणय फुके यांची वर्णी लागली आहे.

– राधाकृष्ण विखे पाटील (कॅबिनेट मंत्री)

– जयदत्त शिरसागर (कॅबिनेट मंत्री)

– डॉ. आशिष शेलार (कॅबिनेट मंत्री)

– डॉ. संजय कुटे

– सुरेश दगडू खाडे

– डॉ. अनिल बोंडे (कॅबिनेट मंत्री)

– डॉ. अशोक उईके (कॅबिनेट मंत्री)

– तानाजी जयवंत सावंत (कॅबिनेट मंत्री)
– योगेश सागर (राज्यमंत्री)
– अविनाश माहतेकर (राज्यमंत्री)
– संजय भेगडे (राज्यमंत्री)
– परिणय फुके (राज्यमंत्री)
– अतुल सावे (राज्यमंत्री)

यांना मंत्रीमंडळातून मिळणार डच्चू?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील एमपी मिल कंपाऊंड गृहनिर्माण प्रकल्पात लोकायुक्तांनी ठपका ठेवल्याने अडचणीत आलेले गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांना मंत्रिमंडळातून अर्धचंद्र मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच प्रदीर्घ अनुभव असतानाही आपल्या कामाची छाप पाडण्यात मागे पडलेले आणि सध्या रुग्णालयात दाखल असलेले आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रविण पोटे पाटील, आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अंबरिश अत्राम यांना मंत्रिमंडळातून वगळण्याचा निर्णय भाजपने घेतला असून त्यांना राजीनामे देण्यास सांगण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.