नागपूर : महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात पुन्हा एकदा शब्दांचा वार सुरू झाला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट आणि घणाघाती प्रहार केला आहे. “उद्धवजी, खंडणीखोरांचा सरदार कोण आहे हे महाराष्ट्रातील जनतेला चांगलं ठाऊक आहे. विधानसभा निवडणुकीत ‘मुख्यमंत्री’ आणि ‘चोर मुख्यमंत्री’ यातला फरक जनतेनं दाखवून दिला. उद्योगपतींच्या घराबाहेर जिलेटिन ठेवून, तुमच्या नेतृत्वाखाली १०० कोटींची वसुली सुरू होती, हे लोक विसरलेले नाहीत,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले.
बावनकुळे पुढे म्हणाले, “आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यापूर्वी आपल्या भूतकाळाचा विचार करा. इंडी आघाडीत तुमची शेवटच्या रांगेतील किंमत महाराष्ट्रानं पाहिली आहे. दिल्लीतील आंदोलनात सहभागी न होण्यामागेही हेच कारण होतं—कारण तिथे तुम्हाला शेवटच्या रांगेत बसवण्यात आलं असतं. त्याऐवजी तुम्ही महाराष्ट्रात केवळ काही मोजक्या लोकांना घेऊन आंदोलनाचा दिखावा केला. तिकडे राहुल गांधी आंदोलन करत असताना तुम्ही वेगळं आंदोलन उभं करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पूर्णपणे निष्फळ ठरला.”
त्यांनी ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळावरही टीका करताना म्हटले, “मुख्यमंत्री असताना तुम्ही लोकशाहीचा आणि नैतिकतेचा गळा घोटला होता. सत्तेत असताना तुम्ही घेतलेले निर्णय, चालवलेली व्यवस्था आणि तुमचा कारभार यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. आज देवेंद्र फडणवीसांसारख्या प्रामाणिक, विकासाभिमुख आणि पारदर्शक नेतृत्वावर आरोप करण्याआधी स्वतःला आरशात पाहणं गरजेचं आहे.”
बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाचे समर्थन करताना सांगितले, फडणवीसांचं उद्दिष्ट केवळ भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र घडवणं नाही, तर स्थिर, विकासकेंद्री आणि पारदर्शक प्रशासन देणं आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील जनतेचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. मात्र, उद्धव ठाकरेंबाबत लोकांमध्ये निराशा आणि कंटाळा वाढला आहे.
ही टीका समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.