Published On : Thu, Sep 10th, 2020

राज्यपालांच्या हस्ते स्मशानभूमी कर्मी, स्वच्छता कामगार, भाजी विक्रिते, पोलीस यांसह कोविड योद्ध्यांचा सत्कार

Advertisement

करोना उद्रेकानंतर जाहीर झालेल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये जीवाची पर्वा न करता आपल्या कार्याच्या माध्यमातून अविश्रांत सेवा करणाऱ्या डॉक्टर्स, पोलीस अधिकारी यांसह जनसामान्य कोविड योध्यांचा आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला.

स्पंदन आर्ट्स संस्थेने आयोजित केलेल्या कोविड योद्ध्यांच्या सत्कार सोहळ्यात डॉ. जलील परकार, डॉ. शशांक जोशी, पोलीस उपायुक्त प्रणय अशोक, पोस्ट मास्तर मुंबई सर्कल स्वाती पाण्डे, पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले, योगशिक्षिका सुनैना रेखी यांसह स्मशान भूमी व कब्रस्तान कर्मचारी, स्वच्छता कर्मी, पोस्टमन, फळ-भाजी विक्रेते, मोक्षवाहिनी चालक यांचा राज्यपालांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

भारतात यापूर्वी प्लेगसारखे करोनापेक्षाही भयंकर संकटे येऊन गेली आहेत. परंतु भारतातील लोकांमध्ये ‘सेवा ही परमो धर्म:’ हा संस्कार रुजलेला आहे. त्यामुळे परस्परांना मदत करून लोकांनी वेळोवेळी संकटांवर धैर्याने मात केली आहे. गेल्या पाच महिन्यात करोना योद्ध्यांनी समर्पण भावनेनी केलेली सेवा ही खरी ईशसेवा असल्याचे सांगून सर्वांनी आगामी काळात सेवा आणखी वाढवावी अशी अपेक्षा राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली.

आमदार आशिष शेलार यांनी करोना योद्ध्यांच्या सत्कारामागची भूमिका सांगितली तर बांद्रा हिंदू असोसिएशनचे अजित मन्याल यांनी आभार प्रदर्शन केले.