Published On : Sat, Jul 11th, 2020

महाविकास आघाडी सरकार राज्याच्या पोलीस विभागात मोठे फेरबदल करणार आहे?

सूत्रांच्या माहितीनुसार, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात या विषयावर चर्चा झाली. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, अनिल परब यांच्यासोबत ही चर्चा झाल्याचं कळतंय. नव्या नियुक्त्यांची यादी तयार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई/नागपूर  : महाविकास आघाडी सरकार राज्याच्या पोलीस विभागात मोठे फेरबदल करणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसात राज्यात मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहे. ठाणे, पुणे, नागपूर, मीरा-भाईंदर आयुक्तांसह मुंबई गुन्हे शाखेचे सहआयुक्त, कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त तसेच अनेक आयजी रँक अधिकारी यांच्यांही बदल्या करण्यात येणार आहेत. यावेळी कोणताही वाद निर्माण होऊ नाही यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून अंतिम आदेश देतील असं कळतंय. गेल्या वेळी मुंबई डीसीपींच्या बदलीबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मतभेद निर्माण झाले होते. त्यानंतर सरकारमध्ये समन्वय नसल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात आला होता.

सूत्रांकडून नागपूर टुडे मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या शनिवारी केवळ राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात या विषयावर चर्चा झाली. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, अनिल परब यांच्यासोबत ही चर्चा झाल्याचं कळतंय. नव्या नियुक्त्यांची यादी तयार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याशी चर्चा करून या यादीवर शिक्कामोर्तब करतील.

नागपूर टुडेला मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी आपल्या दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यामुळे या जागेसाठी नवीन पोलीस आयुक्तांचा विचार केला जात आहे. ठाणे पोलीस आयुक्त पदाच्या शर्यतीत जयजीत सिंह, कुलवंतकुमार सरंगल, बिपीन कुमार सिंह यांची नावं चर्चेत आहेत. तर राज्य गुप्तचर विभाग प्रमुखपदी विवेक फणसळकर यांचं नाव चर्चेत आहे. विद्यमान चीफ रश्मी शुक्ला यांना बढती देण्याची चर्चा आहे.

यासोबत पुणे पोलिसांचे विद्यमान आयुक्त व्यंकटेशम यांनीही त्यांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. अशा परिस्थितीत ठाकरे सरकार येथेही बदल करण्याची तयारी करत आहे. पुणे आयुक्त पदाच्या शर्यतीत अतुलचंद्र कुलकर्णी, राजेंद्रसिंह, रितेश कुमार, संजय कुमार यांची नावं आघाडीवर आहेत.

यासह नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांचीही बदली होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तपदासाठी बी पा सिंह यांचे नाव पुढे असल्याचं सांगितले जात आहे. त्याचबरोबर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सहआयुक्त पदासाठी यशश्वी यादव आणि सहआयुक्त कायदा व सुव्यवस्थेसाठी मिलिंद भारंबे यांच्या नावाची चर्चा आहे. तर नव्याने तयार झालेल्या मीरा भाईंदर आयुक्तालयासाठी सदानंद दाते यांचे नाव पुढे आहे. सदानंद दाते हे देखील राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख पदाच्या शर्यतीत आहेत.

यासोबतच आयजी स्तरावर मोठे फेरबदल करण्यास तयार असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. त्यानंतर येत्या काही दिवसात मोठ्या संख्येने राज्यात पोलीस उप-आयुक्तांच्या बदल्याही करण्यात येतील.

गेल्या आठवड्यात मुंबईतील 10 डीसीपींची बदली केल्याबद्दल शिवसेना आणि राष्ट्रवादीत संघर्ष निर्माण झाला होता. असं म्हटले जात होते की राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना विश्वासात न घेता डीसीपी बदल्यांची यादी जारी केली. ज्यामुळे मुख्यमंत्री नाराज झाले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार त्या बदल्या थांबवण्यात आल्या आणि सात दिवसानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार नवीन यादी देण्यात आली. या वेळेस मुख्यमंत्री स्वत:या मोठ्या बदली यादीवर अंतिम शिक्कामोर्तब करणार आहेत.

…रविकांत कांबळे