Published On : Thu, Mar 23rd, 2017

नारायण राणे देणार कॉंग्रेसला सोडचिठ्ठी, सेना-भाजपसोबत थाटणार नवा संसार ?

Advertisement

मुंबई: महापालिका, जिल्हा परिषद आणि पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील राजकीय समीकरणे बदलायला सुरू झाली आहेत. राज्यातील खिळ बसलेल्या कॉंग्रेसला आणखी मोठा धक्का लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे हे कॉंग्रेससोबत फारकत घेऊन शिवसेना किंवा भाजपसोबत नवा संसार थाटणार अशी जोरदार चर्चा राज्यातील राजकीय वर्तुळात रंगली आहे. नारायण राणे यांचे चिरंजीव नीलेश राणे यांनी मंगळवारी काँग्रेसच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिल्यानं या चर्चेला हवा मिळाली आहेच, पण स्वतः राणेंनीही आपल्या सूचक प्रतिक्रियेतून सर्वांना बुचकळ्यात टाकले आहे.

राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते नारायण राणे हे पक्षात घुसमट होत असल्याकारणाने शिवसेना-भाजपाच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे. नारायण राणेंना शिवसेनेत प्रवेश द्यायचा की, नाही यावर शिवसेनेत मंथन सुरु असल्याचे वृत्त एबीपी माझा वृत्तवाहिनीने दिले आहे. २००४ मध्ये नारायण राणेंची शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेला अनेक धक्के दिले होते. त्यामुळे आता पुन्हा त्यांना स्वगॄही घेणार का? अशीही चर्चा आहे. तर भाजपने आपली दारे सर्वांसाठीच उघडी करून ठेवली आहेत. (हे पण वाचा: कोकणात कॉंग्रेसला धक्का; वाचा निलेश राणे यांचे राजीनामा पत्र)

लोकसभा निवडणुकीत नीलेश राणेंचा पराभव झाला होता, तर विधानसभा निवडणुकीत नारायण राणेंनाच पराभवाचा धक्का बसला होता. राज्यातही काँग्रेसची कामगिरी निराशाजनकच झाल्यानं प्रचारप्रमुख म्हणूनही राणे अपयशी ठरले होते. परिणामी, काँग्रेसमधील त्यांचं स्थान डळमळीत झालं होतं. याउलट, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची लाज राखणारे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं महत्त्व वाढलं होतं. त्यामुळेच प्रदेशाध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे देण्यात आली होती आणि राणे बाजूला पडले होते.

नारायण राणे पुन्हा शिवबंधन बांधण्याच्या तयारीत असल्याची चर्चा गेल्या तीन-चार दिवसांपासून रंगली आहे. आता पुन्हा राणेंबाबत ‘मातोश्री’ विचार करत असल्याचं बोललं जातंय. शिवसेना माझी शत्रू नसल्याचं सूचक विधान राणेंनी महापालिका निवडणुकीवेळी केलं होतं. मात्र सोबतच ते भाजपमध्येही जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे कोडं कधी सुटणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भाजपाही नारायण राणेंबद्दल अनुकूल आहे. कोकणात भाजपालाही राणेंसारखा भक्कम नेता हवा आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलाच्या लग्नावरुन परत येताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांनी एकत्र प्रवास केला होता याकडेही राजकीय विश्लेषकांनी लक्ष वेधले आहे. नारायण राणेंनी मागच्या दोन एक वर्षात सातत्याने काँग्रेसवर टीका केली आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षबदलाच्या चर्चांना उधाण आले आहे. स्वत: नारायण राणेंनी आपण काँग्रेसमध्येच आहोत. शिवसेना किंवा भाजपाच्या कुठल्याही नेत्याला भेटलो नसल्याचे सांगितले आहे.

विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषदांमध्ये भाजपने मोठं यश मिळवलं असून राज्यातील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचं महत्व अतिशय कमी झालं अहे. भाजपला टक्कर देणारा एकच पक्ष म्हणजे शिवसेना हा आहे. त्यामुळे एकतर ते सेनेत नाहीतर भाजपमध्ये जातील, अशी चर्चा आहे.

दरम्यान, नारायण राणेंनी या चर्चा फेटाळल्यात असल्या तरी त्यांच्या बोलण्यातून संकेत मात्र तसेच मिळत आहेत. ‘मी काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. पण त्यांनी माझं मत घेतलं पाहिजे. शिवसेना किंवा भाजपचा कुणीही नेता माझ्याशी बोललेला नाही. जेव्हा अन्य पक्षात जायचा निर्णय घ्यायचा असेल, तेव्हा मी जाहीरपणे सांगेन’, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी व्यक्त केली.