Published On : Thu, Jan 18th, 2018

महाराष्ट्र बिझनेस लीडर, इस्त्रायली उद्योजकांनी गुंतवणूक करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Advertisement

मुंबई: देश विदेशातील उद्योजकांनी महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक केली आहे. महाराष्ट्र राज्य हे बिझनेस लीडर असून इस्त्रायलच्या उद्योगपतींनी महाराष्ट्रात उद्योग सुरु करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

हॉटेल ताज येथे आयोजित ‘भारत-इस्त्रायल उद्योग संमेलन-2018’ च्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, इस्त्रायल आणि भारताची मैत्री ही दोन हजार वर्षापासून आहे. दोन्ही संस्कृती गुण्यागोविंदाने नांदत आहेत. गेल्या 25 वर्षांपासून दोन्ही देशांचे राजनैतिक संबंध आहेत. इस्त्रायलने केलेल्या कृषी क्रांतीचे जगभर कौतुक होत आहे. भारताने वेळोवेळी इस्त्रायली कृषी तंत्रज्ञानाचा वापर करुन कृषी क्षेत्राचा विकास साधला आहे. उत्पादन वाढीसाठी होत असलेले विविध संशोधन आणि प्रयोग याचा फायदा कृषी उद्योगाला होत आहे. महाराष्ट्राला आपल्या सहकार्याने कृषी क्षेत्र विकसित करुन उत्पादन वाढवायचे आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी आणायची आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले, महाराष्ट्र राज्यात उद्योग वाढीस पोषक वातावरण आहे. आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. देशातील अन्य राज्यांपेक्षा सर्वात मोठी 50 टक्के आर्थिक गुंतवणूक या राज्यात झाली आहे. इस्त्रायलच्या उद्योजकांसाठी गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आणि संधी आहे.

दहशतवादासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, पाकिस्तानी अतिरेक्यांनी 26/11 रोजी हल्ला केला. त्याला सडेतोड उत्तर सुरक्षा रक्षकांनी दिले. दोन्ही राष्ट्रे दहशतवादाविरुद्ध लढत आहेत. आता एकत्रपणे लढून दहशतवाद मोडून काढायचा आहे.

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू म्हणाले, भारत आणि इस्त्रायलची फार जुनी मैत्री आहे. दोन्ही देशाला उज्ज्वल भविष्य आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सारखे खंबीर नेतृत्व भारताला लाभले आहे. विकासाच्या आड येणारा दहशतवाद ही दोन्ही राष्ट्रांची समस्या आहे. आता परिस्थिती बदलली आहे. कोणत्याही दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी भारत आणि इस्त्रायल हे देश सज्ज आहेत.

इस्त्रायलमध्ये चांगले संशोधक, तंत्रज्ञ आहेत. विकासाभिमुख वातावरण आहे. दोन्ही देशाच्या उद्योग वाढीसाठी चांगल्या संधी आहेत. आता एकत्र काम करुन विकास साधायचा आहे. भारतासोबत नुकतेच नऊ सामंजस्य करार केले आहेत. त्यात सायबर सुरक्षा, ऑईल आणि गॅस, सोलर थर्मल एनर्जी, अवकाश तंत्रज्ञान, पाण्याचे नियोजन, विमान वाहतूक, आरोग्य सुविधा, चित्रपट निर्मिती, कृषी तंत्रज्ञान आणि संरक्षण साधन सामुग्री विषयक कराराचा समावेश आहे. खासगी क्षेत्र व्यापक आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योगांना सोबत घेऊन देशाचा आर्थिक स्तर उंचवायचा असून जगभर स्पर्धा वाढलेली आहे. जगाबरोबर चालायचे आहे. त्यासाठी भारताच्या सहकार्याची आवश्यकता आहे. विविध क्षेत्रात देवाण घेवाण वाढवायची आहे.

प्रारंभी इस्त्रायलचे भारतातील राजदूत डॅनियल कारमॉन यांनी प्रास्ताविकातून ‘भारत-इस्त्रायल उद्योग संमेलन-2018’ ची भूमिका स्पष्ट केली. यावेळी इस्त्रायल आणि भारतातील उद्योगपती उपस्थित होते.