मुंबई: राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार राज्याचा अर्थसंकल्प सादर केला असून शेतकरी तसेच शहर, शिक्षणासाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. याचसोबत महापुरुषांच्या स्मारकांसाठी 200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
शिवाजी पार्कमधील महापौर बंगल्यातील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी अर्थ संकल्पात २ कोटींच्या निधीची तजवीज करण्यात आली आहे.
कोणत्या स्मारकांसाठी आहे निधी ??
महापौर बंगल्यातील बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक
शिवरायांचे अरबी समुद्रातील सागरी स्मारक,
कोल्हापुरातील राजर्षी शाहूंचे स्मारक,
अहिल्याबाई होळकरांचे जामखेडमधील स्मारक,
दादर येथील इंदु मिलमधील डॉ. आंबेडकरांचे स्मारक
ही स्मारके उभारणे सरकारसमोरचे सध्याचे प्रमुख उद्दीष्ट आहे.
राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारचा हा तिसरा अर्थसंकल्प. सुधीर मुनगंटीवार यावेळी आपल्या अर्थसंकल्पातून कोणत्या क्षेत्रांकडे लक्ष देणार, येत्या एक जुलैपासून देशभरात वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे देशभरात एकच कर लागू होणार आहे. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पातील जमेची बाजू कशी भरून निघणार, हे सर्व बघण्यासाठी संपूर्ण राज्याचे लक्ष अर्थसंकल्पाकडे लागले होते.
गदारोळातच अर्थसंकल्प
विरोधकांनी सुरु केलेला गदारोळ, शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहिला. त्यामुळे या गदारोळातच मुनगंटीवारांनी अर्थसंकल्प सादर केला. मुनगंटीवार यांनी विरोधकांचे चिमटे काढत, कधी कविता, कधी शेरो-शायरी सादर करत बजेट मांडले.
सरकार ३८ हजार ८९२ कोटींचे घेणार कर्ज
मुनगंटीवारांनी यंदाचा ६२ हजार ८४४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. राज्य सरकार ३८ हजार ८९२ कोटी कर्ज यावर्षी काढणार आहे. त्यामुळे राज्यावरील एकूण कर्ज ४ लाख १३ हजार ४४ कोटी रुपये असेल. तर महसुली तूट ४५११ कोटी रुपये आहे.