मुंबई : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील ६ लाख २२ हजार पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये तब्बल ५,०२८ कोटी रुपयांची रक्कम थेट ऑनलाइन जमा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृह येथे या लाभ वितरणाचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे आणि सहकार आयुक्त दीपक तावरे उपस्थित होते. राज्यातील सर्व पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि सहकारी संस्थांचे निबंधक दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ५,०२८ कोटी रुपयांची रक्कम थेट जमा करण्यात आली आहे. कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्य सरकारने सर्व संबंधित बँकांना दिले आहेत. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी शासनाने बँकांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील विविध बँकांकडून कर्जखात्यांचा मोठ्या प्रमाणात डेटा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यातील ३० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, १२ राष्ट्रीयीकृत बँका आणि इतर खासगी बँकांसह एकूण ५३ बँकांनी महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे.
विविध बँकांकडून सुमारे ३२ लाख कर्जखात्यांचा डेटा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यापैकी ६ ऑगस्ट २०२६ अखेर १२ लाख १० हजार कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्याची माहिती सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी सादरीकरणाद्वारे दिली.
योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादीही संबंधित बँकांकडून महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. ही यादी ग्रामपंचायत कार्यालये तसेच संबंधित बँकांच्या शाखांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना आपल्या नावाची आणि कर्जमुक्तीच्या लाभाची माहिती सहजपणे तपासता येणार आहे.
या प्रक्रियेत प्रत्येक शेतकऱ्याला एक विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची ओळख आणि कर्जमुक्तीची प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक होणार आहे. पहिल्या टप्प्यात ६.२२ लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ५,०२८ कोटी रुपये जमा झाल्याने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून, उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण आणि लाभ वितरणाची प्रक्रिया पुढे सुरू राहणार आहे.





