नागपूर : महानिर्मितीमधील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. महानिर्मितीमध्ये मागील पाच वर्षांत तब्बल १० हजार कोटी रुपयांचा कोळसा घोटाळा झाल्याचा आरोप पटोले यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याऐवजी दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. पटोले यांनी पत्रकार परिषदेत काही कोळसा कंत्राटदारांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
वॉशरीसाठी पुरवण्यात येणारा कोळसा दर्जाहीन असल्याच्या तक्रारी महानिर्मितीकडून करण्यात आल्या असतानाही संबंधितांवर कारवाई का झाली नाही, असा सवाल त्यांनी केला. याशिवाय यापूर्वी काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या संबंधितांना पुन्हा कंत्राटे मिळत असल्याचा आरोपही त्यांनी केला. निविदा प्रक्रियेत बदल करून ठरावीक व्यक्तींना फायदा मिळवून दिला जात असल्याचा दावाही पटोले यांनी केला.
ऊर्जा खाते मुख्यमंत्र्यांकडे असतानाही राज्यातील वीज ग्राहकांवर आर्थिक भार वाढत असल्याची टीका त्यांनी केली. स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरूनही पटोले यांनी सरकारला घेरले. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहकांच्या अडचणी वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. वीज दर आणि महानिर्मितीतील कथित गैरव्यवहाराबाबत सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. या कथित घोटाळ्याबाबत मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन कठोर कारवाईची मागणी करणार असल्याचे पटोले यांनी सांगितले. सरकारने योग्य ती पावले उचलली नाहीत, तर या प्रकरणाबाबत जनतेच्या मनात सरकारच्या भूमिकेविषयी गंभीर प्रश्न निर्माण होतील, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अमेरिकेतील कथित विरोधावरूनही पटोले यांनी केंद्र सरकारला सवाल केला. संघटनेच्या आर्थिक स्रोतांपासून ते अमेरिकेतील विरोधापर्यंत विविध मुद्द्यांवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. भागवत नागपुरात परतल्यानंतर या विषयावर काय स्पष्टीकरण देतील, याकडे लक्ष लागले असल्याचेही पटोले म्हणाले.




