Published On : Mon, Dec 17th, 2018

महा मेट्रो : एम.डी. ब्रिजेश दीक्षित यांनी प्रकल्पाच्या कार्याची केली पाहणी

हिंगणा डेपो, ट्रॅक व स्टेशनचे कार्य वेळेत पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

नागपूर : महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी आज सोमवार, १७ डिसेंबर रोजी रिच-३ कॉरिडोर (लोकमान्य नगर ते सीताबर्डी) मध्ये आतापर्यंत झालेल्या कार्याचे निरीक्षण केले. हिंगणा डेपो मध्ये सुरु असलेल्या कार्याचा आणि लोकमान्य नगर ते सुभाष नगर मेट्रो दरम्यान निर्माणाधीन मेट्रो स्टेशन, मेट्रो ट्रॅक व इतर संबंधित कार्याचा त्यांनी आढावा घेतला.

तसेच स्टेशनवरील प्लॅटफॉर्म, ओएचई, लिफ्ट, एस्केलेटर आणि विद्युतीकरण संबंधित कार्यांची देखील पाहणी केली. सर्वप्रथम हिंगणा डेपो येथे सुरु असलेल्या कार्याचे डॉ. दीक्षित यांनी बारकाईने निरीक्षण करून कोचेसचे मेंटेनन्स करणारे इंजिनिअर ट्रेन युनिट (ईटीयू), कोचेस धुण्याचे स्वयंचलित तांत्रिक कक्ष, सिस्टम्ससाठी उपयुक्त संयुक्त सेवा व इतर संबंधित कार्य वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

सीताबर्डी येथील मुंजे चौक मेट्रो स्टेशन ते लोकमान्य नगर पर्यंत अश्या १०.३ किमीच्या या मार्गावर एकूण १० स्टेशन प्रस्तावित आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर महाविद्यालय आणि एमआयडीसीमुळे रिच-३ मार्गावर वाहनचालकांची मोठी गर्दी होताना निदर्शनास येते. यामुळे भविष्यात नागरिकांना मेट्रोमुळे मोठा फायदा होणार आहे. वाहन चालवताना होणारा त्रास आणि वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर मात करण्यासाठी देखील मेट्रो फायदेशीर ठरणार आहे.

मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) तपासणीपूर्वी डॉ. दीक्षित यांनी रिच-३ कॉरिडोर मधील कार्याची पाहणी केली. आगामी दिवसात देखील कार्य वेगाने पूर्ण करण्यासाठी डॉ. दीक्षित यांनी याठिकाणी कार्यरत सर्व अधिकाऱ्यांना, कंत्राटदारांना व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले. यावेळी महा मेट्रोचे संचालक(प्रकल्प) महेश कुमार, संचालक(रोलिंग स्टॉक) सुनील माथूर व मेट्रोचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.