नागपूर: राखी पौर्णिमेनिमित्त महालक्ष्मी जगदंबा आईची पालखी दत्तासूर महाराजांकडे राखी बांधण्यासाठी नेण्यात आली. हा सोहळा खूप आनंदाने आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. भक्तांनी मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने या सोहळ्यात सहभाग घेतला होता.
देवीच्या दर्शनाने वातावरण भक्तिमय झाले. ही नवीन परंपरा भक्तांसाठी खास ठरली आणि या निमित्ताने मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण होते.
नवसाला पावणारी आई म्हणून देखील कोराडीची देवी प्रसिद्ध आहे. पूर्वी कोराडी हे जाखापूर या नावाने ओळखले जात असे. जाखापूरचा राजा झोलन याला सात पुत्र होते. जनोबा, नानोबा,बानोबा, बैरोबा, खैरोबा, अग्नोबा आणि दत्तासूर. परंतु एकही कन्यारत्न नसल्याने राजा दु:खी होता. त्याने यज्ञ, हवन, पूजा, तपश्चर्या करून देवाना प्रसन्न केले आणि एक कन्यारत्न मागितले. दिव्य, पवित्र, तेजोमय रुपगुणसंम्पन्न कन्येच्या रुपाने अवतरलेल्या आदिमायेच्या अनेक दिव्य अनुभूती राजाला येत असत.
तिने राजाला अनेक कठीण प्रसंगात मार्गदर्शन करून योग्य निर्णयाप्रत पोहचवले. एका युद्ध प्रसंगी तिने राजाच्या शत्रुविषयी देखील योग्य निर्णय देऊन न्यायप्रियतेचे दर्शन घडवले. झोलन राजाला आदिमायेच्या दिव्य शक्तीचा पुन:प्रत्यय आला. अवतारकार्य पूर्ण झाल्यामुळे सूर्य मावळल्यानंतर देवी ज्या स्थानी विराजमान झाली. कोराडी येथील हे मंदिर महालक्ष्मी जगदंबा माता मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.