Published On : Tue, Feb 16th, 2021

महाकृषी ऊर्जा अभियान एकरकमी थकबाकी भरणाऱ्या २६ शेतकऱ्यांचा महावितरणकडून सत्कार

नागपूर : महाकृषी ऊर्जा अभियान २०२० च्या माध्यमातून महावितरणच्या नागपूर परिमंडला अंतर्गत असलेल्या नागपूर व वर्धा जिल्हयातील १ लाख ८२ हजार ३३२ कृषिपंप ग्राहकांना आपले वीजबिल कोरे करण्याची सुवर्णसंधी महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी आणि महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी या अभियानात सहभागी होण्यासाठी आज सोमवारी कळमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अभियानात सहभागी होऊन ४ लाख ५० हजार थकबाकी भरणाऱ्या २६ शेतकऱ्यांचा महावितरणकडून सत्कार करण्यात आला

कळमेश्वर तालुक्यातील उपरवाही, निंबोळी, खैरी हर्जी व तेलंगाव येथे नागपूर विभागाचे प्रादेशीक संचालक सुहास रंगारी, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या उपस्थितीत महाकृषी ऊर्जा अभियान २०२० अंतर्गत मेळावे घेण्यात आले. यावेळी आवाहनास प्रतिसाद देत या योजने अंतर्गत एकूण २६ कृषिपंपधारक ग्राहकांनी एकरकमी ४ लाख ५० हजार रुपयांचा भरणा केला.

या प्रसंगी प्रादेशिक संचालक आणि मुख्य अभियंता यांच्या हस्ते थकबाकी भरणाऱ्या मधुकर मानकर, प्रवीणकुमार निगोट,मारोती फुकटे,लक्ष्मण हेलोंडे,धोंडबा हेलोंडे,वसंता अढाऊ,भास्कर भोयर,मेहबुब खान,विनाकुमार मोहता,नीलकंठ भिंगरे,बालाजी सहरे,रामचंद्र महाजन,दादाराव कवले ,प्रवीण वाढई ,इंदुबाई आंबेकर,बाबाराव केळे आदी कृषी ग्राहकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास उपस्थित तेलंगाव सरपंचा श्रीमती चंदाताई गायधने आणि बाबा महाजन यांनी सौर उर्जेकरिता जागा उपलब्ध करून दिली याबद्दल त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. यावेळी उपरवाहीचे सरपंच चंद्रप्रकाश साठवणे, तेलंगावचे माजी सरपंच बाळू भिंगारे, सावनेर विभागाचे कार्यकारी अभियंता कुलदीप भस्मे, उपकार्यकारी अभियंता राणे, कनिष्ठ अभियंता अमोल राऊत व इतर अधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कृषिपंपाच्या नवीन वीजजोडण्या तसेच वीजबिलांच्या वसुलीसाठी थकबाकी, व्याज व विलंब आकारात सवलत देणारे महाकृषी ऊर्जा अभियान ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकारातून नुकतेच जाहीर झाले आहे. ज्या ग्राहकांनी या अभियानात एक ते तीन वर्षांसाठी सहभाग घेतला त्यांनी त्या-त्या वर्षी भरलेल्या मूळ थकबाकीच्या रकमेपैकी पहिल्या वर्षी ५० टक्के, दुसऱ्या वर्षी ३० टक्के आणि तिसऱ्या वर्षी २० टक्के माफ करण्यात येईल. तसेच मूळ थकबाकीचा भरणा करताना चालू वीजबिलांची रक्कम भरणेही गरजेचे आहे.

कृषिपंप ग्राहकांना वीजबिलांची थकबाकी, माफी व भरावयाची रक्कम हा तपशील महावितरणने https://billcal.mahadiscom.in/agpolicy2020/ या वेबपोर्टलवर उपलब्ध करून दिला आहे. केवळ ग्राहक क्रमांक टाकल्यावर या अभियानातील सवलत व भरावयाच्या रकमेसह इतर तपशील उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी महावितरणच्या संबंधित कार्यालयात संपर्क साधावा व वीजबिल थकबाकीमुक्तीच्या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन नागपूर विभागाचे प्रादेशीक संचालक सुहास रंगारी महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे व मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले आहे.