Published On : Wed, Oct 10th, 2018

महानिर्मिती “अवार्ड फॉर एक्सलन्स इन ट्रेनिंग” या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

Advertisement

मिडल इस्ट लिडरशीप व जी.सी.सी. बेस्ट एम्प्लॉयर ब्रांड अवार्ड २०१८ चे पुरस्कार वितरण दुबई येथील पंचतारांकित हॉटेल अॅड्रेस बोलेव्हर्ड येथे ३ ऑक्टोबर २०१८ रोजी करण्यात आले. मध्य पूर्व आखाती देशातील सुमारे ५० नामांकित कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये महानिर्मिती कंपनीला “अवार्ड फॉर एक्सलन्स इन ट्रेनिंग” या संवर्गासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कृत करण्यात आले. विशेष म्हणजे भारत, श्रीलंका, बांग्लादेश, दुबई, अबूधाबी,शारजाह, सौदी अरब, कतार, ओमन या देशातील वीज, विमा, फार्मा, पेट्रोलियम, बँकिंग, शैक्षणिक, टेलीकॉम, रियल इस्टेट, औद्योगिक व हॉटेल क्षेत्रातील अग्रगण्य अश्या कॉर्पोरेट्सचा यामध्ये सहभाग होता व विविध क्षेत्रातील तज्ज्ञ असे सुमारे २०० प्रतिनिधी ह्या आंतरराष्ट्रीय परिषदेला प्रामुख्याने उपस्थित होते.

परिषदेच्या प्रथम सत्रात प्रत्येक कॉर्पोरेट्समार्फत संगणकीय सादरीकरण करण्यात आले. महानिर्मितीतर्फे विनोद बोंदरे यांनी प्रभावी सादरीकरण केल्याने परीक्षकांच्या चमूने महानिर्मितीची सदर पुरस्कारासाठी निवड केली. श्रीलंका सरकारच्या श्रीलंका साथोसा या सर्वात मोठ्या रिटेल व्यापाराचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मोहम्मद फराज शउल हमीद यांचे हस्ते महानिर्मितीचे कार्यकारी संचालक(मानव संसाधन) विनोद बोंदरे यांना सन्मानित करण्यात आले. नाविन्यपूर्ण व अभिनव प्रशिक्षण योजनांमुळे संस्थात्मक पातळीवर सकारात्मक बदल होत असल्याचे विनोद बोंदरे यांनी सांगितले. संस्थात्मक व वैयक्तिक पातळीवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कॉर्पोरेटसची परीक्षकांनी निवड करून मान्यवरांच्या हस्ते सदर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

महानिर्मितीने मागील काही वर्षात वीज उत्पादनाच्या प्रक्रियेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने मनुष्यबळाला आकार देण्यासाठी अभिनव पद्धतीचे प्रशिक्षण, नवनवीन योजनांची अंमलबजावणी केली, भरती ते सेवानिवृत्ती अश्या विविध पातळ्यांवर प्रशिक्षण कार्यक्रमातून परस्पर विश्वास, तंत्रज्ञान, प्रशिक्षण कौशल्य विकास आणि वीज निर्मितीचे ध्येय गाठणे सुकर झाले व पर्यायाने महानिर्मितीच्या विकासात प्रशिक्षणाची महत्वाची भूमिका राहिली आहे.

महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे, संचालक(प्रकल्प) विकास जयदेव, संचालक(वित्त) संतोष आंबेरकर, संचालक तथा सल्लागार(खनिकर्म) श्याम वर्धने तसेच सर्व कार्यकारी संचालक व वीज केंद्रांचे मुख्य अभियंते यांनी कार्यकारी संचालक(मानव संसाधन) विनोद बोंदरे व टीम महानिर्मिती मानव संसाधनचे ह्या निमित्ताने विशेष अभिनंदन केले आहे. या पुरस्काराने महानिर्मितीची आंतरराष्ट्रीय स्तरावर एक स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.