Published On : Thu, Aug 30th, 2018

महाबोधी विहारासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढा देणार!

Advertisement

नागपूर : जेव्हापासून बुध्द आणि बाबासाहेब समजले तेव्हापासून बुध्द धम्मासाठीच आयुष्य समर्पित केले. हे कार्य पुढेही असेच सुरू राहणार आहे. आज वयाची ८४ वर्षे पूर्ण केली तरी बरेच कार्य पुढे न्यायचे आहेत. बुध्दगया येथील महाबोधी महाविहाराच्या मुक्तीलढ्यासाठी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करणार, असा निर्धार दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केला.

इंदोरा बुध्द विहार सार्वजनिक संस्थेच्या वतीने गुरुवारी (ता. ३०) भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचा ८४ वा वाढदिवस व ज्येष्ठ नागरिक सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

इंदोरा येथील बुध्द विहारात आयोजित कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून माजी मंत्री डॉ.नितीन राऊत, इतिहासकार प्रा. एम.एम. देशमुख, सुप्रसिध्द न्यूरोलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम, मध्यप्रदेशातील सागर विद्यापीठाचे माजी उपकुलपती प्रा. एन.एस. गजभिये, विदर्भ विकास महामंडळाचे सदस्य देवाजी तोफा, नागपूर महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विशेष समितीचे सभापती संदीप जाधव, नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार, नगरसेविका स्नेहा निकोसे, ममता सहारे, ॲड. भास्कर धमगाये, अमित गडपायले, मनपाचे जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, ॲड. अजय निकोसे उपस्थित होते.

समाजातील सर्व नेत्यांनी पक्षभेद विसरून बुध्दगया महाबोधी विहाराचे व्यवस्थापन बौध्दांच्या ताब्यात असावे यासाठी उभारलेल्या लढ्याला बळ द्यावे, असे आवाहनही यावेळी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केले. आज जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी बुध्दाच्या धम्माची गरज आहे. प्रत्येकाने बुध्द आणि बाबासाहेबांचे विचार आत्मसात केल्यास उन्नती होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

माजी मंत्री नितीन राऊत म्हणाले, महाबोधी विहाराचा मुक्तीलढा, मनसर येथील उत्खनन, हुसेन सागरातून बुध्दांची मूर्ती काढणे अशा अनेक आंदोलनात भदंत सुरेई ससाई यांच्याशी संपर्क आला. नागपुरात निवासाला असले तरी भदंत ससाई यांनी देशभरात बुध्द व बाबासाहेबांचे विचार रुजविण्यासाठी कार्य केले, त्यांचे कार्य आज पुढे नेणे ही आपली जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.

भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई वयाच्या १४ व्या वर्षी भिक्खू झाले. त्यांचे नाव तेन्जी ससाई होते. तेन्जी म्हणजे प्रकाश व ससाई म्हणजे पर्वताएवढा. आज भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचे कार्य पाहता त्यांनी नावाप्रमाणेच उंची गाठली आहे, अशी भावना यावेळी सुप्रसिध्द न्यूरोलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी व्यक्त केली. १५ ऑक्टोबर १९५६ ला टाऊन हॉलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण ऐकले व धन्य झालो. बाबासाहेबांना जेव्हापासून समजू लागलो तेव्हापासून त्यांचा फोटो खिशात ठेवू लागलो. आज बहुजन समाजाचा उपयोग शस्त्रासारखा होत आहे. त्यामुळे त्या शस्त्रांशी न भांडता शस्त्र पकडलेल्या हातावर वार करण्याची गरज आहे, असे मत इतिहासकार प्रा. एम.एम. देशमुख यांनी व्यक्त केले. मध्यप्रदेशातील सागर विद्यापीठाचे माजी उपकुलपती प्रा. एन.एस. गजभिये व विदर्भ विकास महामंडळाचे सदस्य देवाजी तोफा यांनीही आपल्या भाषणात भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त दिर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

जपानमधून भारतात येऊन इथे बौध्द धम्माच्या उत्थानासाठी कार्य करणे ही संपूर्ण भारतवासीयांना प्रेरणा देणारी बाब आहे. आज देशातील परिस्थिती लक्षात घेतल्यास भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी हाती घेतलेले कार्य पुढे नेण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन यावेळी मनपाचे कर आकारणी व कर संकलन विशेष समितीचे सभापती संदीप जाधव यांनी यावेळी केले.

प्रारंभी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांना इंदोरा बुध्द विहार कार्यकारिणीतर्फे शाल, स्मृतीचिन्ह, चिवरदान, पुष्पगुच्छ देउन गौरविण्यात आले. दीक्षाभूमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे विश्वस्त सुधीर फुलझेले, विलास गजघाटे व प्राचार्य डॉ. पी.सी. पवार यांनीही भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचा सत्कार केला. यावेळी इतिहासकार प्रा. एम.एम. देशमुख, सुप्रसिध्द न्यूरोलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम, मध्यप्रदेशातील सागर विद्यापीठाचे माजी उपकुलपती प्रा. एन.एस. गजभिये, विदर्भ विकास महामंडळाचे सदस्य देवाजी तोफा यांचा भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण नागदिवे यांनी केले. मान्यवरांचे स्वागत संस्थेचे सचिव अमित गडपायले व उपाध्यक्ष ॲड. भास्कर धमगाये यांनी केले. भंते नागघोष यांनी बुद्धवंदना तर अशोक जांभुळकर यांनी संचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील अंडरसहारे, ॲड. अजय निकोसे, विजय इंदुरकर, रोशन उके, आनंद राउत, विक्रांत गजभिये, संदीप कोचे, प्रसेनजीत डोंगरे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाला भिक्खू संघ, नालंदा वसतीगृहातील विद्यार्थिनी, विद्यार्थी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.