Published On : Thu, Aug 30th, 2018

इंडिया पोस्‍ट पेमेंटस्‌ बँक नागपूर शाखेचे 1 सप्‍टेंबरला केंद्रीय मंत्री गडकरींच्‍या हस्‍ते उद्धघाटन

Advertisement

नागपूर:केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाच्‍या अधीन डाक विभागातर्फे आय.पी.पी.बी. (इंडियन पोस्‍ट पेमेंटस्‌ बँक) च्‍या नागपूर शाखेचे उद्धघाटन 1 सप्‍टेंबर शनिवार रोजी जी.पी.ओ. बिल्डिंग, सिवील लाइन्‍स येथे दुपारी 2.30 वाजता केंद्रीय रस्‍ते वाहतूक, महामार्ग व केंद्रीय जलसंपदा मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते होणार आहे.

याप्रसंगी राज्‍यसभेचे खासदार डॉ. विकास महात्‍मे, रामटेकचे खासदार श्री. कृपाल तुमाने व नागपूरातील आमदार प्रामुख्‍याने उपस्थित राहतील. आय.पी.पी.बी. बँक स्‍थापन करण्‍याचा उद्देश हा ‘वित्‍तीय समावेशन’ असून तळागाळातील सामान्‍यांना बॅकींग क्षेत्राच्‍या कक्षात आणून त्‍यांचे जीवनमान उंचावणे हा आहे, अशी माहिती नागपूर विभागाचे पोस्‍टमास्‍टर जनरल श्री. रामचंद्र जायभाये यांनी जी.पी.ओ.मध्‍ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पत्र सूचना कार्यालयाचे सहायक संचालक शशिन राय, आय.पी.पी.बी. बँक नागपुरचे शाखा व्यवस्थापक अभिजीत जिभकाटे उपस्थित होते.

देशभरात सुरूवातीला 650 शाखा व 3250 अॅक्‍सेस पॉईटस यांच्‍या माध्‍यमातून 1 सप्‍टेंबर 2018 पासून आय.पी.पी.बी. च्‍या सुविधा सुरू होतील तर 31 डिसेंबर पर्यंत उर्वरित सुमारे 1.55 लाख अॅक्‍सेस पॉईटस कार्यरत होतील.नागपूर विभागातील 11 जिल्‍हयात 11 शाखा व 44 अॅक्‍सेस पॉईटस 1 स्‍प्‍टेंबर पासून सुरू होतील.

आय.पी.पी.बी. मध्ये कॅशलेस व्‍यवहाराकरिता ‘क्‍यूआर कार्ड’ उपयोगाचे असून व्‍यापारी,व्‍यावसायिक यांना या कार्डद्धारे डिजीटल व्‍यवहार करता येणे शक्‍य होईल.बँकेतर्फे मनी ट्रांन्‍सफर, थेट लाभ हस्‍तातरंण, देयकाचा भरणा व मोबाईल बॅकिंग अॅप, मायक्रो- ए.टी.एम., आर. टी. जी.एस, आय.एम.पी.एस. या सुविधा अत्‍याधुनिक तंत्रज्ञानासह उपलब्‍ध राहतील. आय.पी.पी.बी. च्‍या ‘क्‍यूआर कार्डचे’ वितरण निवडक खातेधारकांना कार्यक्रमस्थळी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्यात येईल.

या बँकेत खाते उघडण्यासाठी आधार संलग्नित ‘इ-केवायसी’ यंत्रणेचा अवंलब केला जात असल्याने ग्राहकांना कोणतेही कागदपत्र बाळगण्याची गरज नाही. ग्राहक आय.पी.पी.बी. पोर्टलवर जाऊन ऑनलाईन डिजीटल खातेसुद्‌धा उघडू शकतात. आय.पी.पी.बी. च्या खात्याची जमा क्षमता ही 1 लक्ष असून 1 लक्ष पेक्षा जास्त रक्कम ही त्या ग्राहकाच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यामध्ये पी.पी.एफ., सुकन्या समृद्‌धी योजना, यासारख्या बचतीच्या साधनांमध्ये वळवली जाते. आय.पी.पी.बी. च्या खात्यामधून खातेदारांना पोस्ट ऑफिसच्या स्पीड पोस्ट , पार्सल डिलीव्हरी अशा सेवांचे डिजीटल पेमेंटही करता येईल.

आय.पी.पी.बी चे राष्‍ट्रीय स्‍तरावर उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्‍ते नवी दिल्‍लीतील ताल कटोरा स्‍टेडियम येथे होणार असून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणही नागपूरातील कार्यक्रमस्‍थळी दाखविण्‍यात येणार आहे. ‘आपका बँक आपके द्वार’ या ब्रीदवाक्याला अनुसरुन ग्राहकांना थेट बँकींगच्या सुविधा मिळवून देण्याच्या उद्देशाने नागपूरात स्थापन होणा-या आय.पी.पी.बी. च्या उद्‌घाटन कार्यकमाला सर्व व्यावसायिक, दुकानदार, वरिष्ठ नागरिक,विद्यार्थी , निवृत्तीधारक यांनी उपस्थित रहावे,असे आवाहन नागपूर विभागाचे पोस्‍टमास्‍टर जनरल श्री. रामचंद्र जायभाये यांनी केले आहे.