Published On : Thu, Jun 20th, 2019

महा मेट्रो : ‘सीएमआरएस’ने यशस्वीरीत्या पूर्ण केले परीक्षण 

मेट्रोच्या कार्यावर केले समाधान व्यक्त 

Nagpur Metro Logo

नागपूर: महा मेट्रो नागपूर प्रकल्पाच्या परीक्षणासाठी दोन दिवसीय नागपूर दौऱ्यावर आलेल्या ‘सीएमआरएस’ (मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त) पथकाने आज अखेरच्या दिवशी यशस्वीरीत्या परीक्षण पूर्ण केले. नागपूर मेट्रोच्या रिच-१ (खापरी ते सीताबर्डी इंटरचेंज) दरम्यान झालेल्या कार्याबद्दल ‘सीएमआरएस’ने समाधान व्यक्त केले.

आज सलग दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी सकाळी ७ वाजता पासून ‘सीएमआरएस’पथकाने परीक्षणाला सुरवात केली. प्रथम खापरी ते सीताबर्डी इंटरचेंज दरम्यान ट्रॉलीने प्रवास करून ट्रॅकचे निरीक्षण करण्यात आले. मेट्रो ट्रॅक, स्टेशन, रोलिंग स्टॉक (मेट्रो कोच) व संबंधित घटकांची पाहणी ‘सीएमआरएस’ने केली. यादरम्यान विविध ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यकुशलतेचे प्रदर्शन करत संबंधित कार्याची माहिती’सीएमआरएस’ला दिली.

अजनी मेट्रो स्टेशन, जयप्रकाश नगर मेट्रो स्टेशन आणि एयरपोर्ट मेट्रो स्टेशनची पाहणी करत’सीएमआरएस’ पथकाने स्टेशनवरील कार्याचा आढावा घेतला. दिव्यांग, जेष्ठ तसेच महिलांसाठी करण्यात आलेल्या विशेष सोयी सुविधांची पाहणी ‘सीएमआरएस’ने केली. यानंतर खापरी स्टेशनवरील सुविधांची तपासणी करून खापरी ते सीताबर्डी इंटरचेंज दरम्यान मेट्रोने प्रवास पथकाने केला. 

स्टेशनवर लावण्यात आलेले धूळ शोधक यंत्र (स्मोक डिटक्षन सिस्टम), सामानाची तपासणी करणारे स्कॅनर, सुरक्षा व्यवस्था इत्यादी सुविधांची तपासणी करण्यात आली. तसेच स्टेशन परिसरात लावण्यात आलेल्या अग्निशामक यंत्रणा, ऑटोमॅटिक फेयर कलेक्शन (एएफसी) सिस्टम, लिफ्ट, एस्केलेटर, इतर आवश्यक सुविधा जसे पिण्याचे पाणी सुविधा व वॉश रूमचे निरीक्षण ‘सीएमआरएस’ने केले. 


मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत संपूर्ण माहिती सीएमआरएस अधिकाऱ्यांना देण्यात आली. यावेळी महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित,संचालक (प्रकल्प) श्री. महेश कुमार, संचालक (रोलिंग स्टॉक) श्री. सुनील माथुर, संचालक (वित्त) श्री. एस शिवमाथन, कार्यकारी संचालक(टेलीकॉम) श्री. विनोद अग्रवाल,महाव्यवस्थापक श्री. सुधाकर उराडे, श्री.गुरबानी,श्री. रामटेक्कर,श्री.कोकाटे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.