Published On : Fri, Mar 13th, 2020

कोरोना व्हायरसचा प्रकोप टाळण्याकरिता महा मेट्रोतर्फे विविध उपाय योजना

Advertisement

नागपूर– संपूर्ण जगात कोरोना व्हायरसचा प्रकोप आणि त्यामुळे बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वत्र आणि सातत्याने वाढत असताना, याची गंभीर दखल महा मेट्रोने घेतली आहे. महा मेट्रोतर्फे या निमित्ताने देखील विविध उपाय योजना राबवल्या जात आहेत. मेट्रो स्टेशन तसेच इतरत्र या संबंधाने पाऊले उचलली जात आहेत.

मेट्रोने प्रवास करणाऱ्यांकरता प्रत्येक स्टेशनवर उद्घोषणा होत आहे. या अंतर्गत या रोगाच्या प्रादुर्भावापासून बचाव करण्याकरिता तसेच याची लागण होऊ नये म्हणून आवश्यक असलेल्या बाबींसंबंधी माहिती दिली जाते आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने प्रत्येकाने कुठली काळजी घ्यायला हवी या संबंधीची माहिती या उद्घोषणेत दिली जाते आहे. या रोगाची नेमकी लक्षणे काय आणि ती जाणवल्यास काय करायला हवे याची देखील माहिती याअंतर्गत दिली जाते आहे.

केंद्र सरकारने प्रसारित केलेल्या उद्घोषणा स्टेशनवरून प्रसारित केल्या जात आहेत. या उद्घोषणे शिवाय या सर्व बाबींसंबंधी माहिती देणारे फलक देखील स्टेशनवर लावले जात आहेत. मेट्रो गाडीच्या साफ सफाई आणि स्वच्छतेकडे अधिक लक्ष दिले जात असून ऑरेंज आणि एक्वा मार्गिकांवर धावणाऱ्या मेट्रोच्या ताफ्यातील सर्वच गाड्यांच्या सफाईकडे लक्ष दिले जाते आहे. गाड्यांशिवाय स्टेशनच्या साफ-सफाई कडे देखील कटाक्षाने लक्ष दिले जात आहे.

महा मेट्रोच्या कर्मचाऱ्यांना देखील या रोगाच्या निमिताने अधिक सतर्क केले आहे. एकीकडे या सारख्या उपाय योजना होत असताना, या रोगाची बाधा होऊ नये याकरिता सर्व सामान्य नागपूरकरांनी प्रयत्न करावे असे आवाहन महा मेट्रो तर्फे करण्यात येत आहे.