Published On : Thu, May 10th, 2018

उष्णेतेवर मात करण्यासाठी नागपूर मेट्रोचा ‘हिट ऍक्शन प्लान’

Nagpur Metro Logo

नागपूर : उन्हाळ्याचे वाढते तापमान आणि त्यामुळे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम बघता महा मेट्रो नागपूरने हिट ऍक्शन प्लानच्या अंमलबाजवणीला सुरवात केली आहे . याअंतर्गत महा मेट्रोने प्रकल्पांतर्गत काम करणाऱ्या सर्व कंत्राटदारांना भर दुपारी कामगारांकडून काम करून घेऊ नये अश्या सूचना दिल्या आहेत.

१ मे पासून तर ३० जूनपर्यंत चालणाऱ्या हिट ऍक्शन प्लानअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर विशेष भर दिल्या जाणार आहे. मे महिन्यात पारा ४५ अंश सेल्सियस च्या सुमारास असतो. वाढत्या पाऱ्यामुळे अंगाची काहिली तर होतेच पण यामुळे उष्माघाताची देखील आशंका असते. नागपुरात मेट्रोचे सर्वत्र काम सुरु असताना उन्हात काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याची काळजी असल्याने महा मेट्रोने हिट ऍक्शन प्लानच्या अंमलबाजवणीचा निर्णय घेतला आहे. या प्लानच्या नियमावली प्रमाणे उन्हात होणारी सर्व कामे दुपारी १२ ते ४ वाजेदरम्यान करू नये अश्या स्वरूपाच्या स्पष्ट सूचना महा मेट्रोने कंत्राटदारांना दिल्या आहेत.

कामगारांची सोय बघता हा प्लान राबविला जात असला तरीही यामुळे प्रकल्पाच्या कामावर फरक पडणार नाही याची देखील खबरदारी घेतली आहे. यासाठी कामाच्या वेळापत्रकात बदल करून काम सकाळी ७ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत निर्धारित कार्य पूर्ण केले जाते. कामांच्या वेळेचे अश्या प्रकारे नियोजन केल्याने प्रकल्पाची गती कायम तर राहतेच शिवाय कर्मचाऱ्यांना उन्हापासून विश्रांती मिळत आहे.

एकीकडे कामाच्या वेळात बदल होत असतानाच दुसरीकडे मेट्रोच्या कार्यस्थळी देखील कर्मचाऱयांच्या सुरक्षतेकरता विविध उपाय योजना राबविल्या जात आहे. याअंतर्गत कार्यस्थळी सावली करता शेड लावण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय तर केली आहेच, पण याशिवाय विविध पेयांच्या माध्यमाने शरीराचे संतुलन बिघडणार नाही याचीही दक्षता घेतली जाते. उन्हापासून स्वतःचे रक्षण करण्याकरता कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले असून यासंबंधी मॉकड्रिलचे आयोजन देखील वेळोवेळी केले जाते. उष्माघाताचा त्रास झाल्यास केल्याजाणाऱ्या उपाय योजनांची माहिती या मॉकड्रिल अंतर्गत दिली जाते. हिट ऍक्शन प्लानच्या अंमलबाजवणीला सुरवात झाल्यापासून वेळेतील बदल आणि कर्मचाऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधा लक्षात घेता हिट ऍक्शन प्लानला कर्मचाऱ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.