Published On : Thu, Feb 22nd, 2018

मॅग्नेटिक महाराष्ट्र : आदिवासी विकास विभागाचे विविध कंपन्यांसोबत 34 सामंजस्य करार

Advertisement

मुंबई: राज्य शासनाने आयोजित केलेली मॅग्नेटिक महाराष्ट्र ही गुंतवणूक परिषद यशस्वी ठरली असून आदिवासी विकास विभागाला या गुंतवणूक परिषदेत उत्तम प्रतिसाद लाभला आहे. गेल्या चार दिवसात विभागाचे विविध कंपन्यांशी 34 सामंजस्य करार झाले असल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी आज दिली.

प्रधान सचिव मनिषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच आदिवासी विकास विभागाने अशा परिषदेत सहभाग घेतला. आदिवासी विकास विभागाच्या स्टॉलला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. अनेक देशी विदेशी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.

पर्यटन,बांबू,वस्त्रोद्योग,वनोत्पादन व मध प्रक्रिया उद्योगासाठी खासगी कंपन्यांसोबत सामंजस्य करार झाले आहेत. आदिवासींच्या आर्थिक विकासासाठी या कंपन्या आदिवासी क्षेत्रात काम करतील. एका संयुक्त कंपनीद्वारे आदिवासीसुद्धा या कंपन्यांचे भागीदार असतील.

महाट्राइब्स या स्टॉलवर वरिष्ठ अधिकाऱ्यांची चमू सामंजस्य करारासाठी परिश्रम घेत आहेत. विविध सामंजस्य कराराद्वारे तरूणांसोबतच हाउसिंग सेंटरद्वारे आदिवासी महिलांना प्रशिक्षण देऊन लघुउद्योगांसाठी घडविण्यात येईल. उद्यापर्यंत आणखी महत्त्वाचे सामंजस्य करार होतील असेही मनिषा वर्मा यांनी यावेळी सांगितले.