Published On : Thu, Feb 4th, 2021

अर्धा यूनिटमध्ये ३५ किमी धावणारी ‘मेड इन नागपूर ट्रायसिकल’

महापौरांनी केले नागपूरकर अभियंता तरुणांचे कौतुक

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेला साद देत व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेच्या आव्हानाला प्रतिसाद देत नागपूरकर तरुणांनी दिव्यांगांसाठी अद्ययावत ‘ट्रायसिकल’ तयार केली आहे. विशेष म्हणजे केवळ अर्धा यूनिट वीजेमध्ये ‘फुलचार्ज’ होणारी ही ट्रायसिकल तब्बल ३५ किमी धावते. अवघ्या ४ रूपयांच्या विजेमध्ये ३५ किमी धावणा-या या ‘मेड इन नागपूर ट्रायसिकल’चे महापौर दयाशंकर तिवारी यांनी खास कौतुक केले आहे.

नागपूरचा तरुण मेकॅनिकल अभियंता अनुराग चित्रिव व अभियंता अमोल उमक या तरुणांच्या ‘अनुराग इंजिनिअरींग कंपनी’द्वारे तयार करण्यात आलेली ट्रायसिकलची महापौर दयाशंकर तिवारी यांनी गुरूवारी (ता.४) मनपामध्ये पाहणी केली. यावेळी विशेषत्वाने माजी आमदार अनिल सोले व मुन्ना महाजन उपस्थित होते.


लिथिमाइन बॅटरीवर संचालित ही ट्रायसिकल असून ११० ते १२० किमी एवढी त्याची वजनक्षमता आहे. ट्रायसिकलच्या मागील चाकाला डिस्क ब्रेक व पुढे पॉवर ब्रेक आहेत. एलईडी हेड लॅम्प व डिजिटल इंडिकेटरमुळे रात्रीही प्रवासासाठी ही ट्रायसिकल सुरक्षित ठरते. बॅटरी संपल्यास अडचण होउ नये यासाठी ‘म्यन्यूअल’रित्या चालविण्याची सुद्धा व्यवस्था त्यात आहे. दिव्यांग बांधवांना साहित्य, वस्तू ने-आण करण्यासाठी मागील बाजूस मोठी पेटी देण्यात आली आहे. २५० यूनिट पॉवर असलेली ट्रायसिकल बाजारात उपलब्ध इतर ई-ट्रायसिकलच्या तुलनेत कमी किंमतीत असल्याची माहिती अनुराग चित्रिव व अमोल उमक यांनी दिली.

याप्रसंगी ‘अनुराग इंजिनिअरींग कंपनी’चे सिद्धेश चौधरी, शैलेंद्र खडसे, रोशन सगने, अमेय रेंगे, भगवानदास राठी आदी उपस्थित होते.