नागपूर– ‘लुटेरी दुल्हन’ म्हणून ओळखली जाणारी समीरा फातिमा अखेर गिट्टीखदान पोलिसांच्या जाळ्यात अडकली. गेल्या दीड वर्षांपासून पोलिसांना चकवा देत समाजात बनावट प्रेमसंबंध आणि लग्नाच्या आमिषाने लाखो रुपये उकळणारी समीरा, नागपूरच्या सिव्हिल लाईन्स परिसरातील एका दुकानात चहा पीत असताना अटक करण्यात आली.
फेसबुकवरून ओळख, लग्न आणि फसवणुकीचा सुरू झाला खेळ-
मार्च 2023 मध्ये पहिली तक्रार दाखल झाली होती. ट्रॅव्हल व्यवसायिक गुलाम गौस पठान यांची तिच्याशी फेसबुकवर ओळख झाली. समीरा फातिमा हिने स्वत:ला घटस्फोटित सांगत सहानुभूती मिळवली आणि त्याच्याशी विवाह केला. काही आठवड्यांतच तिने भांडणे, खोटे आरोप आणि धमक्यांच्या आधारे पैसे उकळायला सुरुवात केली.
तिने पतीवर बलात्काराचा खोटा आरोपही लावला आणि “समझौता” करण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केली. अशीच पद्धत वापरून तिने अनेक पुरुषांना जाळ्यात ओढले.
‘शिक्षिका’च्या मुखवट्याखाली ठकबाजी-
समीरा फातिमा स्वत:ला शिक्षक असल्याचे भासवत असे. सोशल मीडियावर ती खूपच सक्रिय होती. ती विवाहित पुरुषांना “मी एकटी आहे, मला तुझी साथ हवी आहे” असं सांगत भावनिक होऊन फसवत असे. लग्नानंतर काहीच आठवड्यांत ती भांडणं उकरून काढत असे, आणि मग खोट्या गुन्ह्यांची धमकी देऊन पैसे उकळत असे.
-आठ लग्नं, पन्नास लाखांची लूट-
सध्याच्या तपासणीतून असे समोर आले आहे की, समीरा फातिमाने किमान आठ पुरुषांशी लग्न करत एकूण सुमारे ५० लाखांची फसवणूक केली आहे. ती सातत्याने ठिकाणं बदलत होती, पोलिस व न्यायालयीन प्रक्रियेचा गैरफायदा घेत होती. तिचा उद्देश नेहमीच एकच – खटल्यांच्या माध्यमातून पैसे उकळणे.
शिक्षक व्यवसायाची बदनामी-
समीरा फातिमा शिक्षिका असल्याचा दावा करत होती, मात्र तिच्या या गुन्हेगारी वर्तनामुळे शिक्षक या पवित्र व्यवसायालाही काळं फासलं गेलं आहे. शिक्षक समाजात आदर्श मानले जातात, पण एका व्यक्तीच्या फसवणुकीमुळे समाजाचा विश्वास डळमळीत होतो, ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे.
पोलीस कोठडी आणि पुढील तपास-
अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी समीराला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गिट्टीखदान पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू असून, पोलिसांनी इतर पीडितांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणात आणखी किती फसवणुकीचे प्रकार समोर येतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.