
नागपूर : शहरात आज कामगारांच्या हक्कांसाठी ‘विदर्भ प्रदेश श्रमिक आक्रोश महामोर्चा’ची जोरदार सुरुवात झाली. भारतीय मजदूर संघ (ANC) संलग्नित विविध कामगार संघटनांच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने कामगारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
यशवंत स्टेडियम परिसरातून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली असून, मुख्यमंत्री सचिवालयाच्या दिशेने कामगारांचे मोठे लोंढे मार्गक्रमण करत आहेत. ‘कामगार एकता जिंदाबाद’, ‘आमच्या मागण्या पूर्ण करा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
महाराष्ट्र वीज कामगार संघासह विविध विभागांतील कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले असून, दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.
या महामोर्चात कामगारांनी आपल्या प्रमुख मागण्या ठामपणे मांडल्या आहेत. कर्मचाऱ्यांना नोकरी सुरक्षेची हमी द्यावी, विद्युत मंडळातील तांत्रिक कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, कंत्राटी कामगारांसाठी हरियाणा पॅटर्न लागू करावा, तसेच ‘समान काम, समान वेतन’ तत्त्वाची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, या मोर्चामुळे शहरातील काही भागांत वाहतूक व्यवस्थेवर तात्पुरता परिणाम झाला असून, पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. कामगारांच्या या आक्रोशाकडे राज्य सरकार कशा प्रकारे प्रतिसाद देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








