
नागपूर : शेअर बाजारातील गुंतवणुकीत सुमारे ५ लाख रुपयांचा तोटा झाल्यानंतर कर्ज फेडण्यासाठी एका शिक्षित युवकाने बँक लुटण्याचा धक्कादायक प्रयत्न केला. आरोपीने बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत मिरची पूड फेकून तब्बल ४ लाख ५३ हजार रुपये लुटले. मात्र, घटनेनंतर तत्काळ केलेल्या पोलिसांच्या कारवाईत आरोपीला काही वेळातच अटक करण्यात आली.
ही घटना सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भांडे प्लॉट चौक येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत गुरुवारी सायंकाळी घडली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सूरज बोरकर (२८), रा. तातोली, भिवापूर असे आहे. सूरजने बीएससीपर्यंत शिक्षण घेतले असून तो सध्या बेरोजगार असल्याची माहिती आहे.
सूरजने शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी सुमारे ५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, गुंतवणुकीत मोठा तोटा झाल्याने त्याच्यावर कर्जाचा बोजा वाढला. हे कर्ज फेडण्यासाठी त्याने बँक लुटण्याची योजना आखल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सूरज बँकेच्या बाहेर असलेल्या रोख भरणा यंत्रावर लक्ष ठेवून होता. बँक कर्मचारी यंत्रातून रोख रक्कम काढून ती बँकेत जमा करण्यासाठी जात असताना सूरजने त्यांच्या मागून मिरची पूड फेकली. कर्मचाऱ्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला; मात्र सूरजने ४ लाख ५३ हजार रुपयांची रोकड घेऊन पळ काढला. संपूर्ण प्रकार बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.
घटनेची माहिती मिळताच सक्करदरा पोलिसांनी परिसरात नाकाबंदी आणि शोधमोहीम सुरू केली. मारबत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची परिसरात आधीपासूनच गस्त सुरू होती. याचदरम्यान पोलीस कर्मचारी टप्पूलाल चुटे, राजेंद्र मोहोड, शैलेश बेलेकर आणि शरदसिंग टेंभरे यांना एनआयटी उद्यानाजवळ संशयित सूरज पळताना दिसला.
पोलिसांनी त्याचा पाठलाग करून काही अंतरावर त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून लुटीची संपूर्ण रोकडही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सक्करदरा पोलीस करत असून, लुटीच्या कटात आणखी कोणी सहभागी होते का, याचा तपास सुरू आहे.




