Published On : Mon, May 15th, 2023
By Nagpur Today Nagpur News

लोकसभा-विधानसभा एकत्र निवडणूक अशक्य!

- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मत

लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका होतील अशी शक्यता आज तरी दिसत नाही. लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिने विधानसभा अस्तित्वात राहणार आहे. आजच अंदाज व्यक्त करणे घाईचे होईल, असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडले.

त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला. कर्नाटकात झालेल्या पराभवानंतर महाराष्ट्रातील भाजपाला आत्मचिंतन करण्याची गरज नाही, असे सांगून ते म्हणाले, महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी ही सर्वच निवडणुकीत एक नंबरची पार्टी आहे. महाराष्ट्रात भाजपा शिवसेनेचे सरकार आहे. सरकार आणि संघटना मिळून आम्ही ५१ टक्क्यांची तयारी आम्ही करीत आहोत. कर्नाटकमध्ये कॉंग्रेसचा विजय झाला याची कारणे वेगळी आहे. तेथील राजकारण, मुद्दे वेगळे आहे, त्यामुळे कर्नाटकचा महाराष्ट्राशी काहीच संबंध नाही. एखाद्या निवडणुकीत फायदा झाला तर दुसऱ्या निवडणुकीत फायदा होईल असेही नाही.

महाराष्ट्रात ‘नमो चषक’ क्रीडा स्पर्धा
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सर्वोत्तम भारत व नवभारताचा संकल्प केला आहे. २०२४ मध्ये मोदीजींच्या या संकल्पाला पूर्ण करण्यासाठी २५ लाख युवा निवडणुकीमध्ये सहकार्य करणार आहेत, त्यासाठी युवा संवाद यात्रा काढली जाणार आहे. प्रत्येक बूथवर २५ युवा वॉरिअर्स तयार करण्याची योजना आखली आहे. यासोबतच महाराष्ट्रात ‘नमो चषक’ क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन देत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांसाठी तयारी करणार आहोत. युवा संवाद यात्रेतून हा कार्यक्रम राबविण्यात येईल.