नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी घरबसल्या मतदानाची सुविधा नागपुरात सुरू झाल्यामुळे शहरात ८५ वर्षांवरील आणि ४० टक्क्यांहून अधिक अपंगत्व असलेल्या अनेक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.शहरातील रहाटे कॉलनीत राहणाऱ्या ९९ वर्षीय सागरमन मानवत नावाच्या आजोबानेही घरूनच मतदान केले.
मानवत यांचा मुलगा शेलेंद्र मानवत यांनी यासंदर्भात माहिती देत छायाचित्र प्रसिद्ध केले. या फोटोमध्ये नागपूर मतदारसंघासाठी ९९ वर्षीय वृद्ध व्यक्ती आपली पोस्टल मतपत्रिका मतपेटीत टाकताना दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीत कर्मचाऱ्यांसोबत दिव्यांग व ८५ वर्षांवरील मतदारांना पोस्टल बॅलेटची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पोस्टल बॅलेटची संख्या वाढणार असल्याचे चित्र आहे भारत निवडणूक आयोगाने (ECI) ८५ वर्षांवरील मतदारांसाठी सुरू केलेल्या सुविधेअंतर्गत पूर्व नागपूर मतदारसंघातील डायमंड नगर येथील वसंत ढोमणे हे रविवारी घरबसल्या मतदान करणारे नागपूर जिल्ह्यातील पहिले व्यक्ती ठरले आहेत. ज्यांना ४० टक्क्यांहून अधिक अपंगत्व आहे.नागपूर जिल्हा प्रशासन १४ ते १७ एप्रिल या कालावधीत नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील २,३६० पात्र मतदारांची भेट घेत आहेत.
नागपूर मतदारसंघात ८५ वर्षांवरील १,२०४ ज्येष्ठ नागरिक आणि १३७ दिव्यांग व्यक्तींसह १,३४१ मतदारांनी घरबसल्या मतदानाचा पर्याय निवडला आहे. रामटेकमध्ये ८५ वर्षांवरील ८८९ मतदार आणि १३० दिव्यांग व्यक्तींसह एकूण १,०१९ मतदारांनी घरबसल्या मतदानाला प्राधान्य दिले आहे. निवडणूक आयोगाने या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी नागपूरसाठी १६० टीम आणि रामटेक मतदारसंघासाठी १०५ जणांचे पथक स्थापन केले.