नागपूर : शहरातील छत्रपती नगर,शिवाजी नगर, धंतोलीसह रामदासपेठ परिसरातील रहिवाशी भागात महानगर पालिकेच्या नावाने सर्रास बेकायदेशीर पार्किंगचा व्यवसाय सुरू असल्याचे दिसते. छत्रपती नगर परिसरातील या बेकायदेशीर पार्किंगवर ‘नागपूर टुडे’ने प्रकाश टाकला.
गाड्या पार्क करण्यासाठी लोकांकडून 15 ते 20 रुपये आकारले जातात. तसेच येथे पैसे घेतल्यानंतर नागरिकांना नागपूर महानगरपालिकेच्या नावाने पावतीही दिल्या जाते. येथे काम करणाऱ्या व्यक्तीने आपण मनपाला दर महिन्याला एक ठराविक रक्कम देत असल्याचे सांगितले.
लोक परवानगीशिवाय या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या घरासमोर गाड्या पार्क करत असल्याचे दिसते. त्यामुळे तेथील रहिवाशांना मोठी गैरसोय होत आहे. या परिसरात बेकायदेशीर पार्किंगचा व्यवसाय सुरू आहे. अशा परिस्थितीत, नागपूर पोलिस आणि महानगरपालिकेने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे जेणेकरून ही समस्या लवकर सोडवता येईल.
परिसरातील नागरी वसाहतीत अवजड वाहनांसह टूव्हीलर वाहनांनी शिरकाव केल्याचे दिसते. ही वाहने नागरिकांच्या इमारतींच्या अगदी प्रवेशद्वारावर बेकायदा पार्क केली जात असल्याने रहिवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या प्रकाराकडे वाहतूक विभागासह मनपा प्रशासनाने अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
परिसरात गाड्या पार्क केल्यामुळे याठिकाणी पादचाऱ्यांना फारशी जागा उरली नाही. रहिवासी भागात पार्किंग पॉलिसी आणि जागा नसल्याने त्यांची गंभीर गैरसोय होत असून वारंवार तक्रारी करूनही अधिकारी कोणतीच पावले उचलत नसल्याचे रहिवाशांनी सांगितले.