Published On : Sat, Jul 18th, 2020

उद्योजकतेतून अधिक रोजगार निर्मिती शक्य : नितीन गडकरी

अ. भा. माहेश्वरी महासभेच्या पदाधिकार्‍यांशी ई संवाद

नागपूर: विविध प्रकारच्या कला आपल्या देशात अनेकांकडे आहेत. यातून उद्योजकतेचा विकास होईल. आणि उद्योजकतेतून अधिक रोजगार निर्मिती शक्य असल्याचे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय माहेश्वरी महासभेच्या पदाधिकार्‍यांशी ना. गडकरी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधत होते. कोविड-19 ही अत्यंत कठीण परिस्थिती सर्वांवर आली आहे. संपूर्ण जग या परिस्थितीचा सामना करीत असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- निराशा, भय यातून सर्व समाजाला बाहेर काढण्याची गरज आहे. निराशा आणि भय यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.

या काळात समाजात आत्मविश्वास कसा निर्माण होईल यासाठी आपले प्रयत्न आवश्यक आहे. स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतरही अनेक संकटांचा सामना करून आम्ही संकटांवर मात केली आहे. या संकटांतूनही आपल्या सर्वांची लवकरच मुक्तता होईल, असा विश्वासही व्यक्त करून ना. गडकरी म्हणाले- कोरोनासोबत जीवन जगण्याची जी पध्दती विकसित झाली आहे ती आम्हाला स्वीकारावी लागणार आहे.

आव्हानात्मक आर्थिक स्थितीतून आम्ही जात असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- विपरित आर्थिक स्थितीचा सामना आज व्यापारी, उद्योजक, शेतकरी सर्वच जण करीत आहेत. अशा काळात एकसंध राहून आपल्याला काम करावे लागणार आहे.

जोपर्यंत देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढणार नाही, नवीन रोजगार निर्माण होणार नाही तोपर्यंत आपण प्रगती करू शकणार नाही. जल, जमीन, जंगल आणि पशू यावर आधारित अर्थव्यवस्था विकसित करावी लागणार आहे. सांडपाण्याचा उपयोग, कचर्‍यातून विविध वस्तूंची निर्मिती यातूनच उद्योजकतेचा विकास होऊ शकतो. ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर करावे लागेल, असेही ते म्हणाले.

माहेश्वरी समाज हा उद्योजकतेमुळेच मोठा झाला आहे, अशी अनेक उदाहरणे असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- अर्थव्यवस्थेची सर्वाधिक जरूरी रोजगार निर्माण करणे ही असून आमच्यात अनेक कला आहेत, त्या कलांना प्रोत्साहन देणे, त्या विकसित करणे आवश्यक आहे. यातूनच रोजगार निर्मिती होऊ शकेल. परिवर्तन हा व्यक्तीचा स्वभाव असल्याचेही ते म्हणाले.

नाविन्य हे तंत्रज्ञान अद्ययावत करण्यास प्रवृत्त करते असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- नवीन तंत्रज्ञान शोधण्यात आम्हीलोक पुढे आहोत. त्यांना प्रोत्साहन देणे, बाजारात खेळते भांडवल निर्माण करणे गरजेचे असून एमएसएमइ, बँकां, एनबीएफसी या क्षेत्रात परकीय गुंतवणूक आणली गेली पाहिजे. देशातील सर्वच क्षेत्रात अद्ययावत तंत्रज्ञान आणून परकीय गुंतवणूक आणल्यास अर्थव्यवस्था मजबूत होईल.

यासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना देणे, आयात कमी करून निर्यात वाढविणे, समाजातील शेवटच्या माणसाला अन्न, वस्त्र, निवारा मिळणे, जीवन जगण्यासाठी आवश्यक गोष्टी या देशात निर्माण होणे हीच आत्मनिर्भरता असून यामुळेच देश सुपर इकॉनॉमिक पॉवर होऊ शकेल, असेही ते म्हणाले.