Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Mar 3rd, 2021

  बंगालची निवडणूक कोट्यवधी जनतेच्या भविष्याचा निर्णय करणारी : ना. गडकरी

  जौयपूर येथे परिवर्तन यात्रेला मार्गदर्शन

  नागपूर/नवी दिल्ली: पश्चिम बंगालची निवडणूक ही भाजपा, काँग्रेस, सीपीएम, तृणमूल काँग्रेसच्या यांच्या भविष्याचा निर्णय करणारी निवडणूक नाही तर बंगालच्या कोट्यवधी जनतेच्या भविष्याचा निर्णय करणारी ही निडणूक असल्याचे केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

  पश्चिम बंगालमधील जौयपूर येथील परिवर्तन रॅलीला संबोधित करताना ते बोलत होते. मोठ्या संख्येने जनता या रॅलीत सहभागी झाली होती. गरिबी, उपासमार, भ्रष्टाचार व बेरोजगारी मुक्त बंगाल आपल्याला नको काय, असा प्रश्न उपस्थित करून ना. गडकरी म्हणाले-आज बंगालमधील गावांचा विकास नाही. जनता भय, भूक, आतंकवादाच्या छायेत वावरते आहे. हिंसाचार वाढला आहे. हे चित्र आम्ही निश्चितपणे बदलणार. देशातून गरिबी दूर करून हा देश सुखी, समृध्द, संपन्न व शक्तिशाली बनवणार. गावांचा विकास, गरिबी दूर करून, शेतकर्‍यांचे कल्याण करून भारताला विश्वातील महाशक्ती बनविण्याचे आमचे प्रयत्न असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हेच स्वप्न आहे, असेही ते म्हणाले.

  गेल्या 50 वर्षात झाला नाही एवढा विकास आम्ही पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात 5 वर्षात झाल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- 38 कोटी जनतेने जनधन योजनेत खाते उघडले. आज त्यांच्या खात्यात सरळ पैसा जमा होत आहे. 9 कोटी कुटुंबाना गॅसची शेगडी आणि सिलेंडर देणारे हेच सरकार आहे. आज आम्हाला बाहेरचे म्हणून संबोधले जाते. पण आम्ही बाहेरचे कसे? असा प्रश्न उपस्थित करताना ना. गडकरी म्हणाले- जनसंघाच्या माध्यमातून आमचा विचार पुढे नेणारे श्यामाप्रसाद मुखर्जी हे बंगालमध्ये जन्मले होते. जाती धर्माच्या नावावर आम्ही मते मागत नाही. बंगालच्या संस्कृती, इतिहास हा बंगालसोबतच संपूर्ण देशाचा आहे, ही आमची भावना आहे, असेही ते म्हणाले.

  आमचा देश गतीने बदलत आहे. यासोबतच बंगालही बदलला पाहिजे. यासाठी परिवर्तनाची गरज आहे. पं.बंगालने काँग्रेस, सीपीएम, तृणमूल काँग्रेस सर्वांना संधी दिली. जनतेने आता भाजपालाही संधी द्यावी, असे आवाहन करताना ना. गडकरी म्हणाले- दिल्लीला विकासाचे इंजिन मिळाले आहे. मोदींच्या नेतृत्वात आमची गाडी वेगाने पळत आहे. बंगालचे इंजिनही या गाडीला जोडा म्हणजे 5 वर्षात 50 वर्षापेक्षा जास्त विकास करून दाखवू असेही ना. गडकरी म्हणाले.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145