– ‘हरित पर्यावरण चळवळ’ महावृक्षारोपण उपक्रमाचे उद्घाटन
– देशभरात 100 ठिकाणी 1 लाख झाडे लावणार
नागपूर: एलआयटीचा परिसर राष्ट्रीय महामार्गावर असून आज ‘ग्रीन एन्व्हायरो मुव्हमेंट’ महावृक्षारोपण चळवळीअंतर्गत परिसरात एक हजार झाडे लावण्यात येणार आहे. ऑक्सीजन उत्सर्जिंत करणा-या या झाडांमुळे एलआयटीचा परिसर लवकरच ‘ऑक्सीजन पार्क’ होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
एलआयटी माजी विद्यार्थी संघटना (लिटा) च्यावतीने व ग्रीन फाउंडेशन नगापूर, सार्वजनिक बांधकाम विभाग (राष्ट्रीय महामार्ग विभाग), टी&टी इन्फ्रा-लिमिटेड आणि भारत विकास परिषद (स्मार्ट सिटी विभाग, नागपूर) यांच्या सहकार्याने ‘हरित पर्यावरण चळवळ (जीइएम)’ या महावृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून सुरू करण्यात आलेल्या या चळवळीचे उद्घाटन नागपुरातील एलआयटी परिसरात खा. नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या चळवळीअंतर्गत एलआयटी परिसरात एक हजार झाडे लावण्यात आली तर संपूर्ण भारतातील 100 ठिकाणी 1 लाख झाडे लावण्यात आली.
रविवारी झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणचे सल्लागार अशोक कुमार जैन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, मनपा आयुक्त बी. राधाकृष्णन, लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एलआयटी)चे संचालक डॉ. राजू मानकर, लिटाचे अध्यक्ष माधव लाभे, प्रकल्प प्रमुख श्रीकांत गुडधे, सचिव उत्कर्ष खोपकर, ग्रीन फाउंडेशनचे दिलीप चिंचमलातपुरे, नीरीचे माजी संचालक डॉ. सतीश वटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नितीन गडकरी म्हणाले, झाडे तोडण्यापेक्षा प्रत्यारोपण करण्यावर भर दिला जात असून द्वारका एक्स्प्रेस हायवेवर 12 हजार झाडांचे प्रत्यारोपण करण्यात आले आहे. वन व पर्यावरण मंत्रालयासमोर प्रत्येक संस्थेला ट्री बँक स्थापन करण्याची मान्यता देण्यासंदर्भातील प्रस्ताव देण्यात आला असून झाडांची संपूर्ण माहिती त्यामाध्यमातून ठेवली जाईल. एका झाडाचे प्रत्यारोपण करायचे असल्यास पाच नवी झाडे लावावी लागतील व एक झाड तोडायचे असल्यास दहा झाडे लावावी लागतील. वृक्षारोपण करताना कार्बन डॉय ऑक्साईड शोषून घेणारी व अधिक ऑक्सिजन उत्सर्जिंत करणारी झाडे लावली जातील, अशी माहिती नितीन गडकरी यांनी यावेळी दिली.
अशोक कुमार जैन म्हणाले, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त देशभरात 100 ठिकाणी वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याचे उद्घाटन आज नितीन गडकरी यांच्ंया हस्ते होत आहे. राजमार्गावर आतापर्यंत महामार्ग प्राधीकरणने महामार्गांवर 2 कोटी 75 लाख झाडे लावली असून यावर्षी 75 लाख झाडे लावण्याचा मानस आहे.
डॉ. सुभाष चौधरी उपक्रमाला शुभेच्छा देताना विद्यापीठाने तीन एजन्सीला वृक्षारोपणासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. सार्वजनिक कार्यासाठी विद्यापीठाची दारे खुली असून नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी वर्षात ग्राम चलो अभियान, इंडियन सायन्स कॉंग्रेससारखे कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. सुगंधा गारवे यांनी आभार प्रदर्शन बोरकर यांनी यांनी केले.
वृक्षारोपणासाठी पुरस्कृत करणार
नागपुरातील रिमोट सेन्सरच्या कार्यालयाला प्रत्येक जिल्हा, महानगर, ग्रामपंचायत, नगरपालिकांनिहाय झाडांची माहिती गोळा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, असे सांगताना नितीन गडकरी म्हणाले, यापुढे जे जिल्हाधिकारी, महापौर, मनपा आयुक्त, नगरपरिषद अध्यक्ष, सरपंच त्याच्या कार्यक्षेत्रात अधिकाधित झाडे लावतील, त्यांना पुरस्कृत केले जाणार आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यासाठी त्यामुळे प्रोत्साहन मिळेल. विद्यापीठानेही प्रत्येक विद्यार्थ्यांकडून एक झाड लावून घ्यावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.