Published On : Sat, Nov 16th, 2019

‘स्वच्छतेच्या सवयी’साठी लॉयन्स क्लब करणार जनजागृती

Advertisement

मनपा आयुक्तांसोबत बैठक : २७ क्लबच्या सदस्यांची उपस्थिती

नागपूर : यापुढे नागपूर शहराच्या घराघरातून आणि प्रत्येक दुकानातून दैनंदिन कचऱ्याची उचल होणार आहे. कचरा हा निर्मितीस्थळावरूनच विलग करायचा आहे. ओला कचरा आणि सुका कचरा म्हणजे नेमका काय, याबाबत जनजागृतीची आवश्यकता असून शहरातील लॉयन्स क्लबच्या विविध शाखांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. सुमारे २७ लॉयन्स क्लबच्या सदस्यांनी शुक्रवारी (ता. १५) आयुक्तांसोबत चर्चा केली. लॉयन्स क्लबच्या या निर्णयाचे कौतुक आणि स्वागत करीत अन्य संस्थांनीही यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील आयुक्त सभागृहात झालेल्या बैठकीला आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, लॉयन्स क्लबचे विभागीय अध्यक्ष संजय पांडे, लॉयन्सचे डेप्युटी डिस्ट्रिक्ट गवर्नर ॲड. संदीप खंडेलवाल, डॉ. विनोद जयस्वाल यांच्यासह विविध क्लबचे सदस्य सहभागी झाले होते.

आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्वप्रथम उपस्थित सर्व सदस्यांना स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षणाविषयी माहिती दिली. स्वच्छता अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिका लोकांमध्ये जाऊन स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगत आहेत. आयईसी अंतर्गत १२ आठवड्याचा कार्यक्रम तयार करण्यात आला असून प्रत्येक आठवड्यात स्वच्छतेशी संबंधित एका विषयावर जनजागृती करण्यात येईल. रेडिओ, टिव्ही, पथनाट्य, थिएटर आदींच्या माध्यमातून स्वच्छतेचा जागर करण्यात येत आहे. परंतु यामध्ये जोपर्यंत लोकसहभाग वाढणार नाही, तोपर्यंत अभियानाचा उद्देश साध्य होणार नाही. मनपा आयुक्त अभिजीत बांगर पुढे बोलताना म्हणाले, नागपूर शहरातील कचरा उचलण्याची व्यवस्थाही १५ नोव्हेंबरपासून बदलत आहे. यामध्ये आमूलाग्र बदल करण्यात येत आहे. लोकांना कचरा विलगीकरणाची सवय लागावी यासाठी मनपाचे प्रयत्न सुरू आहेत. नव्या व्यवस्थेनुसार नागरिकांना घरातूनच कचरा विलग करून द्यायचा आहे. यासाठी स्वयंसेवी संस्थांनी स्वत:हून जनजागृतीसाठी पुढाकार घेणे, लोकसहभाग वाढविण्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे, असे म्हणत त्यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे अभिनंदन केले.

यानंतर उपस्थित सदस्यांनी जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत काय करता येईल, याबाबत चर्चा केली. आठवड्यातील शनिवार आणि रविवार ह्या दोन दिवशी लॉयन्सचे सदस्य शहरातील मोठमोठ्या सोसायटीमध्ये जाऊन ओला आणि सुका कचरा म्हणजे नेमका काय, तो कसा स्वतंत्र ठेवावा याबाबत मार्गदर्शन करतील. यासाठी मनपाने चित्रफीत उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना एका सदस्याने केली. काही भागामध्ये दोन स्वतंत्र कचरा पेट्यांचा पुरवठा करण्याची तयारीही लॉयन्स क्लबने दर्शविली. नागपूर शहरातील फुटपाथ मोकळे करण्यात यावे, रस्त्यावर येणाऱ्या झाडांच्या फांद्या कापण्यात याव्या, सफाई कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सातत्य असावे, नागपूर शहरातील उद्याने आणि तलावांचे पालकत्व स्वयंसेवी संस्थांना देण्यात यावे, अशा सूचनाही लॉयन्स क्लबच्या सदस्यांनी केल्या.

या सर्व सूचनांचे स्वागत करीत आयुक्त अभिजीत बांगर यांनी त्यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल. त्याबाबत एका कार्यक्रम तयार करण्यात येईल, असे आश्वस्त केले. लोकसहभागातून नक्कीच नागपूर संपूर्ण स्वच्छतेकडे झेप घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नागपूर महानगरपालिकेने जनजागृतीसंदर्भात लॉयन्स क्लबवर जो विश्वास दर्शविला. मनपात आमंत्रित करून मार्गदर्शन केले, याबाबत लॉयन्स क्लबच्या वतीने श्री. विनोद जयस्वाल यांनी आभार मानले.

बैठकीला उपस्थित लॉयन्स क्लब सदस्यांमध्ये सर्वश्री प्रेम व्यास, दिवाकर पाटने, अजित रानडे, राहुल वर्मा, सतीश जैन, नरेश जुमानी, लता खेडकर, जयंत खेडकर, दिलीप कुकडे, टी. एस. भाटिया, अनिल मॅथ्यू, डॉ. रमेश बारस्कर, दिलीप तालेवार, अरुण कुलकर्णी, संजय पांडे, डॉ. दिलीप फुगे, डॉ. डी. टी. खोब्रागडे, डॉ. अमिता खोब्रागडे, डॉ. अरविंद बुटले, डॉ. एन. टी. देशमुख, डॉ. रवींद्र हुंकाळे, अभय वर्मा, अजय हिवरकर, अमिन धमानी, श्रावण कुमार,प्रवीण सरण, जितेंद्र महाजन, संजय आर्य, सारंग ढोक, राकेश गुप्ता आदींचा समावेश होता.

Advertisement
Advertisement