वाठोड्यातील रहिवाशांना आमदार कृष्णा खोपडे व अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी दिला विश्वास
नागपूर: नागपूर सुधार प्रन्यासतर्फे नोटीस बजावण्यात आलेल्या वाठोडा येथील प्लॉटधारकांच्या सोबत संपूर्ण ताकदीने उभे असून येथील रहिवाशांना कोणत्याही अडचणीत अडकविले जाणार नाही, याची संपूर्ण काळजी, घेऊ असा विश्वास पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे व भाजपा प्रदेश सचिव तथा स्थानिक नगरसेवक अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केला.
वाठोडा येथील खसरा क्रमांक १५७ येथील १९.१० एकर जागेतील प्लॉटधारकांच्या समस्यांसंदर्भात रविवारी (६ फेब्रुवारी) आमदार कृष्णा खोपडे यांच्या निवासस्थानी प्लॉट धारकांची बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार कृष्णा खोपडे यांनी प्लॉटधारकांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांना विश्वास दिला.
वाठोडा येथील प्लॉट धारकांना अडचणीत टाकून त्याचे राजकीय भांडवल करण्याच्या उद्देशाने राज्यात सत्ता असलेल्या पक्षांद्वारे हे नोटीस बजावण्याचे षडयंत्र रचण्यात आले आहे. येथील गोरगरीब रहिवाशांना अडचणीत आणून त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेण्याचे कारस्थान महाविकास आघाडी सरकारमधील काही लोक करीत आहेत. मात्र हे सर्व थोपवून येथील रहिवाशांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण ताकदीने उभे आहोत. येथील रहिवाशी नागरिकांच्या संदर्भात कुठलिही असुरक्षितता निर्माण होणार नाही याची काळजी घेत आहोत, असा विश्वास आमदार कृष्णा खोपडे यांनी दिला.
नासुप्रच्या नोटीस विरोधात येथील रहिवाशी नागरिकांद्वारे अनेक पत्रही प्राप्त झाल्याचे यावेळी आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले. येथील प्लॉट धारकांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरून नासुप्रच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याबाबत महापौरांना विनंती करून महापौर कक्षात विशेष बैठक बोलाविण्यासाठी अॅड.धर्मपाल मेश्राम यांनी पुढाकार घेतल्याचेही त्यांनी प्लॉटधारकांना सांगितले. बैठकीत सविस्तर चर्चा करून सर्व कायदेशीर बाबी पुढे आणण्यात आल्या. प्लॉटधारकांच्या वतीने सर्व कायदेशीर मुद्देही मांडण्यात आले. यावर सकारात्मक निर्णय घेण्याबाबत महापौरांनी निर्णयही दिले. त्यामुळे यासंदर्भात लवकरच दिलासा मिळू शकेल. नागरिकांवर ओढवलेल्या परिस्थितीचा फायदा काही लोकांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यांच्याकडे लक्ष न देता नागरिकांनी सावध रहाण्याचे आवाहनही यावेळी उपस्थित प्लॉटधारकांना आमदार कृष्णा खोपडे यांनी केले.
यावेळी अॅड. धर्मपाल मेश्राम म्हणाले, वाठोडा येथील प्लॉटधारकांच्या सुविधेच्या दृष्टीने आवश्यक सर्व कार्य स्थानिक लोकप्रतिनीधींमार्फत करण्यात आले आहेत. येथील पिण्याचे पाणी नितीनजी गडकरी यांचे माध्यमाने केंद्राच्या अमृत योजनेतून तर रस्ते,ड्रेनेज लाईन, या सर्व सोयी आमदार कृष्णा खोपडे यांच्या माध्यमातून व पथदिवे नगरसेवकांच्या निधीतून या रहिवाशी भागात उपलब्ध करण्यात आल्या. नागपूर सुधार प्रन्यासने येथील काही जागा खाली केल्यानंतर तिथे अतिक्रमण करण्याचे काम काही लोकांनी केले. नासुप्रने लीजवर शेती करण्यासाठी दिलेल्या जागेवर परवानगीविना तिथे प्लॉट टाकून विक्री करण्याचे काम करण्यात आले. नासुप्रने नोटीस दिल्यानंतर ही बाब पुढे आली. तोपर्यंत ही बाब कुणाच्याही लक्षात आणून देण्यात आली नाही.
नोटीस प्राप्त झाल्यानंतर आमदार कृष्णा खोपडे यांच्या निर्देशानुसार स्वत: पुढाकार घेऊन महापौरांकडे नासुप्रच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली. बैठकीत नासुप्रच्या बोर्डमध्ये जे निर्णय झाले, आमदार कृष्णा खोपडे यांच्या पत्रानुसार जी कार्यवाही झाली, ती सर्व कार्यवाही महापौरांच्या बैठकीत उजागर करण्यात आली. निर्णयानुसार २०२० पर्यंतची सर्व घरे पक्के करून ते नियमित करण्याचे काम नासुप्रने करायला हवे असा ठराव नासुप्रच्या बोर्डमध्ये झाला आहे. या निर्णयाच्या अनुषंगांने महापौरांनी निर्देशही दिले. मात्र यानंतरही काँग्रेसकडून येथील नागरिकांची दिशाभूल करून त्यांना भरकटविण्याचे काम केले जात आहे. गोरगरीबांच्या हक्काच्या घरांना असुरक्षित असल्याचे भासवून राजकीय स्वार्थ साधणाऱ्या काँग्रेसधुरीनांच्या षडयंत्राला बळी न पडण्याचे आवाहन यावेळी अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी करतांना मनपा निवडणुकीनंतर काँग्रेसचा एकही नेता तिथे जनतेच्या मदतीकरिता पहायला मिळणार नाही, असा दावा देखील धर्मपाल मेश्राम यांनी केला.
बैठकीत चंद्रशेखर पिल्ले, रितेश तांगडे, अजहर खान, मुस्लीम हाफीज, झैनूल भाई, सागर भाई, अली भाई, रमजान, मुजीबुल्ला, अथात भाई, निजाम, शकील, शाकेर भाई, शहाबुद्दीन, यारे मोहम्मद, रझिक भाई, हरून भाई, वर्माजी, बसीरभाई, मजहर आह, राजू, रामजनीभाई, भोलाभाई, गौतम नंदेश्वर, मजार अनाजी यांच्यासह अनेक प्लॉटधारक उपस्थित होते.