Published On : Sat, Aug 17th, 2019

चला करुया विजेची बचत!

मनपा-ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे आवाहन : पोर्णिमा दिनानिमित्त जनजागृती

नागपूर : विजेची बचत आज केली नाही तर भविष्यात वीज संकटाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे आतापासूनच पाणी आणि विजेचे महत्त्व ओळखा. या दोन्ही वस्तूंची बचत करा. इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करा. आपली घरे, प्रतिष्ठानांमध्ये सुरू असलेले अनावश्यक वीज दिवे दररोज किमान एक तासासाठी बंद करा, असे आवाहन मनपा कर्मचारी आणि ग्रीन व्हिजीलच्या स्वयंसेवकांनी केले.

निमित्त होते पोर्णिमा दिवसानिमित्त धंतोली झोन अंतर्गत येणाऱ्या अग्याराम देवी चौक परिसरात आयोजित जनजागृती कार्यक्रमाचे. नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या वतीने प्रत्येक उजेड्या रात्री (पोर्णिमेला) ‘पोर्णिमा दिन’ नामक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

तत्कालिन महापौर तथा आमदार प्रा. अनिल सोले यांनी पोर्णिमा दिवसाची संकल्पना मांडली. ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या माध्यमातून ती सत्यात उतरविली. तेव्हापासून प्रत्येक पोर्णिमेला नागपूर शहरातील नागरिकांना रात्री ८ ते ९ या वेळेत अनावश्यक वीज दिवे बंद करावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येते. ग्रीन व्हिजीलच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून नागपूर शहरातील एका सार्वजनिक ठिकाणी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यामाध्यमातून परिसरतील नागरिकांना, व्यापारांना वीज बचतीचे महत्त्व पटवून देण्यात येते.

शुक्रवारी (ता. १६) अग्याराम देवी मंदिर चौकात महापौर नंदा जिचकार, मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनात ‘पोर्णिमा दिन’ जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके यांची यावेळी उपस्थिती होती. मनपा विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता ए.एस. मानकर आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कौस्तभ चॅटर्जी यांच्या नेतृत्वात कनिष्ठ अभियंता दिलीप वंजारी, सुनील नवघरे यांच्या उपस्थितीत जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, कल्याणी वैद्य, बिष्णुदेव यादव, कार्तिकी कावळे, प्रिया यादव, शांतनु शेळके, आयुष शेळके या स्वयंसेवकांनी व्यापाऱ्यांमध्ये जाऊन वीज बचतीचे महत्त्व पटवून सांगितले आणि अनावश्यक वीज दिवे बंद करण्याचे आवाहन केले. स्वयंसेवकांच्या आवाहनाला दाद देत व्यापाऱ्यांनी एक तासाकरिता अनावश्यक वीज दिवे बंद करीत मोहिमेत प्रतिसाद नोंदविला. परिसरातील नागरिकांनी उपक्रमाचे कौतुक केले.