नागपूर,: नागपूर शहराचा जागतिक स्तरावर विकास करण्यासोबतच देशाचे ग्रोथ इंजिन म्हणून ओळख मिळवून देण्याकरिता सक्षम, लोकाभिमुख व कार्यक्षम धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी नागपूर महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
तंत्र्य दिनानिमित्त शुक्रवार १५ ऑगस्ट रोजी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते मनपा मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मनपा अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना ते संबोधित करीत होते. प्रारंभी त्यांनी मनपाच्या अग्निशमन जवानांच्या परेडचे निरीक्षण केले व विभागाच्या जवानांच्या तीन तुकड्यांनी दिलेली मानवंदना स्वीकारली.
कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी., अतिरिक्त आयुक्त श्री.अजय चारठाणकर, मुख्य अभियंता श्री. मनोज तालेवार, उपायुक्त श्रीमती विजया बनकर, उपायुक्त श्री. मिलिंद मेश्राम, उपायुक्त गणेश राठोड, उपायुक्त राजेश भगत, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त अशोक गराटे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, भारत देश आज जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. लवकरच देश ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल. यात नागपूर शहराचे देखील योगदान असणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्र आणि राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना मनपाद्वारे राबविण्यात येत आहेत. महानगरपालिका यावर्षी आपल्या स्थापनेचा अमृत महोत्सवही साजरा करीत आहे. गेल्या ७५ वर्षात नागपूर शहराचा विकास झाला आहे. यापुढेही विकास करण्यासाठी लोकांचे असे योगदान लाभेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहरात पायाभूत सुविधा बळकट करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे विविध सेवा व सुविधा पुरविण्यात येत आहे. या सुविधा ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. आरोग्य, पाणी पुरवठा, उद्याने, अग्निशमन सेवा सक्षम व लोकाभिमुख करण्यासाठी आपला प्रयत्न आहे. नागपूर महानगरपालिका शहराची पालकसंस्था म्हणून विविध माध्यमातून नागरिकांना सेवा पुरविण्यास कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही देखील यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
प्रशासन अधिक गतीमान करण्यासाठी नागपूर २४५ जणांची भरती प्रक्रिया महानगरपालिकेने पूर्ण केली आहे. आपण नुकताच मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला १०० दिवसांच्या विकासाचे अभियान यशस्वीपणे राबविले आहे. यापुढे आता १५० दिवसाचा कार्यक्रम राबविण्यासाठी त्याची अंमलबजावणी करावयाची आहे. या सर्व योजना सक्षम, लोकाभिमुख व अधिक कार्यक्षमपणे राबविण्यासाठी आपण सर्व जण स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने शपथ घेऊ या, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर यांनी नागपूर शहर एक वेगाने विकसित होणारे शहर असून, देशाच्या विकासात या शहराचे महत्त्वाचे स्थान असल्याचे सांगितले.
यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. तुषार बाराहाते, शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त सर्वश्री श्याम कापसे, हरीश राऊत, विजय थूल, प्रमोद वानखेडे, नरेंद्र बावनकर, श्रीमती स्नेहलता कुंभार, श्री. सतीश चौधरी, श्री. विकास रायबोले साप्रविचे अधीक्षक श्री. राजकुमार मेश्राम, उद्यान अधीक्षक श्री. अमोल चौरपगार, यांच्यासह इतर सर्व कार्यकारी अभियंता, अधिकारी, कर्मचारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रारंभी मनपाच्या अग्निशमन जवानांच्या परेडचे निरीक्षण केले व विभागाच्या जवानांच्या तीन तुकड्यांनी दिलेली मानवंदना स्वीकारली. यावेळी अग्निशमन दलाचे श्री. भगवान वाघ, श्री. दिलीप चौहान, श्री. प्रकाश कवडकर यांनी तुकडीचे नेतृत्व केले. विशेष म्हणजे, यावेळी अग्निशमन दलातील महिला जवानांनी परेड मध्ये सहभाग नोंदवीत मानवंदना दिली.
मनपाच्या तीन युपीएचसी राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकनात अव्वल
केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकनात अव्वल ठरलेल्या शहरातील ३ नागरी प्राथमिक केंद्रातील कर्मचाऱ्यांचा यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी, व अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर यांच्या हस्ते मनपाचा मानाचा दुपट्टा, सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यात नंदनवन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. अश्विनी हेडाऊ, व अधिपरिचारिका श्रीमती अर्चना हजारे, मानेवाडा आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मीनल पटले व अधिपरिचारिका श्रीमती रेणू कवाळे तसेच कपिल आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शकील अहमद व अधिपरिचारिका श्रीमती कल्याणी शिरसाट यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते स्वच्छ भारत मिशन नागपूरचे ब्रँड अम्बेंसॅडर श्री. कौस्तुभ चॅटर्जी व ग्रीन व्हिजिल च्या कु. सुरभी जैस्वाल, श्री. उमेश चित्रीव, श्रीमती आंचल वर्मा, कु. रेषल भाटी यांचा संविधानाची प्रास्ताविका देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन मनपाचे जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी व श्रीमती शुभांगी पोहरे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार श्री. मनीष सोनी यांनी मानले.
दिव्यांगाच्या गीतांनी वातावरण देशभक्ती मय
केंद्र व राज्य शासनाच्या हर घर तिरंगा २०२५ अंतर्गत स्वातंत्र्यदिनानिमित्त मनपा मुख्यालयात दिव्यांग बांधवांच्या गीत गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिव्यांगाचे गायन स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात शहरातील दिव्यांगानी देशभक्तीचे गीते गायिली. यात श्रीमती ईश्वरी पांडे, शोएब शेख, विजया कापकर, धनंजय उपासने यांनी गीते गायिली. त्यांनी गायलेल्या गीतांनी संपूर्ण वातावरण देशभक्तीमय झाले. श्री. प्रकाश कालासिया आणि चमू यांनी राष्ट्रगीत सादर केले.
जलपर्णी पासून तयार वस्तूंचे प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद
नागपूर महानगरपालिका समाज विकास विभागाच्या कौशल्य विकास केंद्राने विकसित केलेल्या तलावातील पर्यावरणाला घातक अशा जलपर्णी वनस्पती पासून विविध गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन मनपा मुख्यालयात लावण्यात आले. ‘व्होकल फॉर लोकल’ चा संदेश देत लावण्यात आलेल्या प्रदर्शनात टी कोस्टर, टोपी, हॅन्ड बॅग, फाईल फोल्डर, फ्रूट बास्केट, कंटेनर, स्मॉल बास्केट, प्लँटर, मॅट बॉक्स, पाण्याची बॉटल बॅग, योगा मॅट, टिफिन बॅग आदी वस्तू प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी या प्रदर्शनाचे अवलोकन केले व प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या