Published On : Fri, May 2nd, 2025
By Nagpur Today Nagpur News

उपराजधानी नागपूरला पाच वर्षात अंतरराष्ट्रीय महानगराचा लौकीक प्राप्त करुन देऊ – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Advertisement

नागपूर : भक्कम पायाभूत सुविधांमध्ये आणखी नियोजनबध्द भर टाकून येत्या पाच वर्षात नागपूर महानगराला आंतरराष्ट्रीय महानगराचा लौकीक प्राप्त करुन देऊ, असा विश्वास राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दूरदृष्टीतून विकास कामांच्या आलेखात नागपूर महानगराने एक मैलाचा टप्पा गाठला असल्याचे त्यांनी सांगितले. कस्तुरचंद पार्क येथे आज महाराष्ट्र दिनाच्या 66 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते.

यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मिणा, पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी आदी उपस्थित होते.

Gold Rate
3 May 2025
Gold 24 KT 93,800/-
Gold 22 KT 87,200/-
Silver/Kg 94,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पंतप्रधान नरेंद मोदी यांनी विकसीत भारताचे स्वप्न पाहिले आहे. विकसीत भारतासमवेत महाराष्ट्राला देशात आघाडीवर आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण प्रशासन काम करते आहे. विकासाच्या प्रक्रीयेत महसूल व गृह विभागाची संयुक्त कार्यक्षमता ही अत्यंत महत्वाची असते. कायदा व सुव्यवस्था, शांतता, परस्पर सहकार्याची भावना यातूनच विकासाला पोषक वातावरण तयार होते असे ते म्हणाले. महिला सशक्तीकरण, शेतकरी, युवा, शासकीय कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, आरोग्य, स्वयंरोजगार, औद्योगिक क्षेत्र, शहरी पायाभूत विकास, ग्रामीण विकास, सांस्कृतिक-क्रीडा विकास, ऊर्जा, प्रभावी जलनियोजन यासाठी शासन मोठ्या प्रमाणात काम करीत असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

महाराष्ट्राच्या वैभवाच्या दृष्टीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा शासनातर्फे बहाल करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष असलेली वाघनखे आपण लंडनहून महाराष्ट्रात आणली. राजे रघुजी भोसले यांची तलवार आता महाराष्ट्रात येत आहे. मराठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी सर्व काही महाराष्ट्र शासन पूर्ण श्रध्देने करत आहे. सर्वसामान्यांना सुशासनाची अनुभूती मिळावी यादृष्टीने प्रशासनात आपण व्यापक बदल केले आहेत. विद्यार्थ्यांना विविध जात प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्रासाठी लागणारा पाचशे रुपये किंमतीचा स्टॅम्प पेपर लागणार नाहीत. विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी करुन लवकर मिळावे यादृष्टीने आपण महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात पदोन्नत्या केल्या. महसूल विभागातर्फे आपण गत शंभर दिवसात सूमारे 47 निर्णय घेतले. भारताच्या फाळणीनंतर ज्या सिंधी बांधवाना विस्थापित व्हावे लागले व त्या सिंधी बांधवाना स्वत:च्या घराच्या पत्त्यासाठी इतके वर्ष जी वाट पहावी लागली त्याबाबत शासनाने निर्णय घेऊन त्यांना आता हक्काचा पत्ता देऊ केला असे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.


सर्वसामान्यांना शासनस्तरावर असलेल्या कामासाठी कुठेही अडचण येऊ नये ही शासनाची भूमिका असून अधिकाधिक पारदर्शकपणा आपण आणला आहे. महसूल विभागासाठी राजस्व अभियानाअंतर्गत वर्षातून किमान चार वेळा प्रत्येक तहसीलमध्ये विविध शिबीरांच्या मार्फत नागरिकांना आवश्यक असलेली विविध प्रमाणपत्रे, महसूली कागदपत्रे दिली जातील. शासनाने शंभर दिवसाअंतर्गत घेतलेल्या उपक्रमात सर्व विभागांनी उत्तम काम केले असल्याचा गौरव पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या भाषणात केला. राज्यात कधी नव्हे ते जलद गतीने महसूल विभागात रखडलेल्या पदोन्नतीच्या प्रक्रियेला आपण गती दिली. सर्वच पातळीवरील पदांच्या पदोन्नती प्रक्रियेला यापुढेही गती दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

घडी पत्रिकेचे प्रकाशन व विविध पुरस्कारांचे वितरण

सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात याउद्देशाने जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने प्रकाशित घडीपत्रिकेचे प्रकाशन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र शासनाचा सिकलसेल कार्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, डॉ. राजकुमार गहलोत, डॉ. निवृत्ती राठोड, डॉ. रेवती साबळे, श्रीमती प्राजक्ता चौधरी यांना पुरस्कार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे याच्या हस्ते देण्यात आला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सचिन तुकाराम कदम यांना व पोलीस अधीक्षक सुरज पुरुषोत्तम भोंगाडे यांना 2023-24 या वर्षातील महासंचालक पदक व प्रशस्तीपत्र पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याचबरोबर विशेष सेवा पदक हे पोलीस निरीक्षक सर्वश्री विनोद गोडबोले, प्रशांत जुमडे, पंकज बोंडसे, विक्रांत सगणे यांना देण्यात आले. याचबरोबर पोलीस निरीक्षक सर्वश्री महेश आंधळे, बाबुराव राऊत, मच्छींद्र पंडित, कैलास बारबाई, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत लाडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र शिरसाठ, प्रमोद चौधरी, राजेश क्षीरसागर, नरेंद्र दुबे, पोलीस हवालदार सर्वश्री सचिन ठोंबरे, श्रीमती रजनी नागुलवार, मंजीत ठाकूर, सुधीर खुबाळकर, महेश कुरसंगे, जितेंद्र तिवारी, श्रीमती पुजा मानिक पूरी, देवेंद्र सहारे यांना पदक प्रदान करण्यात आले.

अग्नीशमन व आपातकालीन विभागातर्फे मुख्य अग्नीशमन अधिकारी गणेश खरटमल यांना असामान्य शौर्य व निष्ठा याबद्दल प्रशंसा प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात आले. ओजस देवतळे यांना धर्नुविद्या, कुमार हरप्रीतसिंग इंद्रजित रंधवा यांना हँडबॉल, शर्वरी गोसेवाडे हिला तलवारबाजी बद्दल तर गुरुदास राऊत यांना गुणवंत खेळाडू पुरस्कार देण्यात आले. 2024-25 चा सामाजिक कार्य बद्दल आकाश बेहनिया यास जिल्हा युवा पुरस्कार देण्यात आला. संदीप आवळेकर यांना आदर्श तलाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

नागपूर ग्रामीणच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती वृष्टी आरती संदीप जैन, रा.पो.उ.नि. राजू चिलकम्मा बालैया सिरबोईना यांच्या नेतृत्वाखाली पथ संचलन करण्यात आले. पथ संचलनात राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4, नागपूर शहर व ग्रामीण पोलीस, रेल्वे पोलीस, बँड पथक, श्वान पथक आदीचा समावेश होता. कार्यक्रमाचे संचलन डॉ. दीपक सावळीकर व महेश बागदेव यांनी केले.

जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांकरिता अग्निशमन वाहने
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जिल्ह्यातील 11 नगर परिषदांना अग्नीशमन वाहनांचे वितरण करण्यात आले. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2024-25 अंतर्गत यासाठी निधीची उपलब्धता करण्यात आली. यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मिणा, पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी आदी उपस्थित होते. याचबरोबर जिल्हा सह आयुक्त श्री.विनोद जाधव, अभियंता ऋषिकेश देशमुख, अग्निशम अधिकारी मिलिंद डुकरे तथा इतर अग्निशमन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
00000

Advertisement
Advertisement