Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Mar 27th, 2018

  विधीमंडळ गटनेते जयंत पाटलांनी सरकारमधील भ्रष्टमंत्र्यांचे काढले वाभाडे


  मुंबई: राज्याच्या गृहनिर्माण मंत्र्यांचा भ्रष्टाचार, कृषीमंत्र्यांनी आपल्या नातेवाईकांना सरकारी योजनांचा दिलेला लाभ तर सहकारमंत्री सुभाष देशमुखांनी आरक्षित भूखंडांवर बांधलेला बेकायदेशीर बंगला असेल किंवा मंत्रालयातील उंदीर घोटाळा असेल या सगळया कारभाराचे आणि सत्तेतील भ्रष्ट मंत्र्यांचे विधीमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी अक्षरश: वाभाडे काढले.

  अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अंतिम आठवडयातील नियम २९२ अन्वये विधीमंडळ गटनेते जयंत पाटील हे बोलत होते.

  जयंत पाटील हे अंतिम आठवडयातील नियम २९२ अन्वये बोलणार असल्याचे माहिती असूनही कॅबिनेटमंत्री सभागृहात उपस्थित राहिले नसल्याने विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर थोडयाच वेळात सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले हे उपस्थित राहिले. त्यानंतर जयंत पाटील यांनी आपल्या भाषणाला सुरुवात करतानाच लोकशाही न मानणाऱ्या पक्षाकडून आणखी कसली अपेक्षा करायची. ज्यांना हुकुमशाहीने राज्य करायचे आहे असा टोला सरकारला लगावला.

  सुरुवातीलाच जयंत पाटील यांनी शिवसेनेने काढलेल्या घोटाळेबाज भाजपमंत्री या पुस्तिकेवर प्रकाश टाकला. जयंत पाटील यांनी ५६ पानांची शिवसेनेने ही पुस्तिका काढली आणि त्याचे प्रकाशन उध्दव ठाकरे यांनी केले होते याची आठवण करुन देतानाच सरकारमधील मित्रपक्षच भाजपाचे असे वर्णन करत असेल तर सर्वसामान्य जनतेने काय करावे असा टोला लगावला.

  सरकारमधील ११ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. खडसेंना वगळता बाकी मंत्र्यांना क्लीनचीट देण्यात आली. यापूर्वी चौकशी समिती नेमली आणि त्याचा अहवाल आला नाही असे झाले नाही. आम्ही त्यावेळी अनेकांना घरचा रस्ता दाखवला आहे. परंतु आज अहवाल येण्याअगोदरच क्लीनचीट मिळत आहे. सरकारमधील गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचा भ्रष्टाचार समोर आला. त्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण लोकपालांकडे चौकशीला आहे. त्यांची चौकशी सुरु असतानाही ते राजरोसपणे मुख्यमंत्र्यासोबत असतात. मेहता यांची चौकशी कधी पूर्ण होईल, लोकपालांनी चौकशी करण्यासाठी इतका वेळ का लावला आणि आम्ही मागणी केलेल्या न्यायमूर्तीकडून चौकशी व्हावी या मागणीचे काय झाले असे अनेक प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केले.

  पारदर्शी कारभाराची ओरड करणाऱ्या सरकारने बक्षी समितीने दिलेला अहवाल आज सभागृहामध्ये ठेवावा आणि योग्य निर्णय घ्यावा. परंतु सरकारला सवय झालीय चौकशी करतो असं गोड पध्दतीने सांगण्याची. त्यामुळे १३ मंत्र्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यांच्या चौकशीचा अहवाल सरकार पटलावर ठेवणार का असे आवाहन जयंत पाटील यांनी सरकारला केले.

  सरकारच्या काळात घोटाळयांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे. फक्त क्लीनचीट देवून पळून जाणे योग्य नाही असा टोलाही जयंत पाटील यांनी सरकारला लगावला. झोपू योजनेतील अधिकारी विश्वास पाटील असतील किंवा मोपलवार या अधिकाऱ्याचा घोटाळा असेल यावर सरकारला धारेवर धरतानाच सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सरकारी भूखंडावर बेकायदा बंगला बांधला असल्याचे प्रकरण तर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नातेवाईकांनाच कृषी खात्यातील साहित्यांचा लाभ दिला गेल्याचे प्रकरणही आज सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

  एकनाथ खडसे यांनी तर उंदीर घोटाळा बाहेर काढून सरकाची गोचीच करुन ठेवली आहे. मंत्रालयातील उंदीर मारण्याच्या प्रकरणाला जयंत पाटील यांनी हात घालतानाच त्यांनी त्या प्रकरणावर आणखी प्रकाशझोत टाकला. ३ लाख १९ हजार गोळया मिळून एका गोळीचे १५ ग्रॅम वजन धरले तर ५ टन गोळयांचे वजन होते. मग एवढया ५ टन गोळया मंत्रालयात कशा गेल्या. आणि मंत्रालयात उंदराचे प्रेत कुणी पाहिले. मंत्रालयाचे कारपेट ६७ हजार ६२० चौरस मीटर आहे. दीड चौरस मीटरला एक गोळी धरली तर पावलोपावली लोकांच्या पायाला गोळी लागायला हवी होती. खरंच उंदीर मारण्याचे प्रशिक्षण या सरकारकडून घ्यायला हवे असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

  त्या गोळयांमध्ये झींक फॉस्फाईट असते ते इतके विषारी असते की त्याच्या वासानेच माणूस बेशुध्द पडतो. मग सरकारने या गोळया ठेवताना मंत्रालयामध्ये गोळया ठेवल्याचे बोर्ड खबरदारी म्हणून लावले होते का? अहो या सरकारला कंटाळलेले लोक मंत्रालयात आत्महत्या करायला येत असताना लोकांनी आत्महत्या कराव्यात म्हणून या गोळया ठेवल्या होत्या का? असा सवाल सरकारला केला.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145