Published On : Fri, Jan 21st, 2022

मेट्रो स्टेशनवर व्यावासायिक उपक्रमाकरीता एलईडी स्क्रीन उपलब्ध

Advertisement

नागपूर : महा मेट्रो नागपूर अंतर्गत कस्तुरचंद पार्क -सिताबर्डी इंटरचेंज-खापरी मेट्रो स्टेशन आणि सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन दरम्यान २६.५ किमी मार्गिकेवर मेट्रो ट्रेनचे संचालन होत असून लवकरच १३.५ किमी मार्गिकेवर मेट्रो ट्रेनचे संचालन होणार आहे. यात सिताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर मेट्रो स्टेशन दरम्यान ८.५ किमी आणि कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशन ते आटोमोटिव्ह चौक मेट्रो स्टेशन ५ किमी मार्गिकांचा समावेश आहे.

या सोबतच महा मेट्रो, नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या मेट्रो स्थानकांवर भाडे पट्टे या तत्वावर व्यवासायिक उपक्रमाकरिता एयरपोर्ट मेट्रो स्टेशन, झाशी राणी चौक आणि कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशन येथे जाहिराती लावण्याकरिता एलईडी स्क्रीन उपलब्ध केल्या आहेत. या स्क्रीनचा आकार २१ X १५ फूट, १३ x ९ फूट , ३.६ X ६.४ फूट एवढा आहे. या संबंधीच्या निविदा महा मेट्रो द्वारे मागविण्यात आल्या असून व्यावसायिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून निविदा सादर करण्याची अंतिम तारीख २७ जानेवारी आहे. व्यावसायिकांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्या असे आवाहन करण्यात येत आहे .

या सोबतच महा मेट्रोने १५ वर्षांकरिता मागविण्यात आलेल्या निविदा मोठ्या व्यावसायिक करता उपलब्ध असून यामध्ये एकूण २४ जागा उपलब्ध करण्यात आल्या आहेत तसेच या निविदेचा कालावधी १५ वर्षा नंतर पुन्हा मागविताना या व्यावसायिकांना प्राधान्य दिल्या जाणार आहे. तसेच लहान व्यावसायिकांकरिता ९ वर्षाच्या कालावधीकरिता मागविण्यात आलेल्या निविदेमध्ये ६७ दुकाने आहेत.

महा मेट्रोने या पूर्वी मागविण्यात आलेल्या निविदेला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून झिरो माईल फीडम पार्क मेट्रो स्टेशन येथील इलेक्ट्रोनिक मार्केट तसेच झासी राणी चौक, सुभाष नगर व लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन येथील व्यावसायिक जागांना प्रतिसाद मिळत या ठिकाणची सर्व दुकाने विकल्या गेली आहेत.

मेट्रो स्थानकांवर उपलब्ध करण्यात आलेल्या जागा तसेच एलईडी स्क्रीन जागेसंबंधी माहिती करिता नागपूर मेट्रोच्या प्रॉपर्टी डेव्हलपमेंट विभागाशी संबंध साधावा असे आवाहन महा मेट्रो करित आहे.

महत्वपूर्ण म्हणजे महा मेट्रोने ५०% महसूल हा नॉन फेयर बॉक्सच्या माध्यमाने अर्जित करण्याचे महत्वकांक्षी लक्ष निर्धारित केले आहे. महा मेट्रोने नेहमीच नॉन फेयर बॉक्सवर लक्ष केंद्रित केले असून स्टॅम्प ड्युटी, टीओडी पॉलिसी, पीडी आणि स्टेशन नेमींग राइटस अश्या विविध योजनांचा यात मध्ये समावेश आहे.