नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी गुरुवारी आरक्षणाची सोडत जाहीर झाली असून, यंदा महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने शहराच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. या निर्णयानंतर महापौरपदाच्या शर्यतीत दोन ताकदवान महिला नगरसेविकांची नावे ठळकपणे पुढे येत आहेत.
लक्ष्मी यादव या महापौरपदाच्या प्रबळ दावेदार-
प्रभाग १६ मधील लक्ष्मी यादव या महापौरपदाच्या प्रबळ दावेदार म्हणून पाहिल्या जात असून, त्यांच्यासोबतच प्रभाग ३५ मधून निवडून आलेल्या नगरसेविका विशाखा मोहोड यांच्याही नावाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी होऊन जवळपास सहा दिवस उलटले असले, तरी महापौरपद कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत शहरात प्रचंड उत्सुकता होती. काही राजकीय वर्तुळात यंदा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र नगरविकास विभागाने गुरुवारी काढलेल्या सोडतीत महापौरपद खुल्या अर्थात सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
राजकीयदृष्ट्या लक्षवेधी बाब म्हणजे २०१७ मध्येही भाजपची सत्ता स्थापन होताच महापौरपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघालाच मिळाले होते. त्यामुळे यंदाही त्याच मतदारसंघातील महिला नगरसेविकेला संधी दिली जाईल, अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
भाजपच्या ज्येष्ठ व अनुभवी नगरसेविका लक्ष्मी यादव-
अनुभव, संघटन आणि ज्येष्ठत्व ठरणार निर्णायक
भाजपच्या ज्येष्ठ व अनुभवी नगरसेविका लक्ष्मी यादव दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. संघटनात्मक अनुभव, प्रशासनाशी चांगला समन्वय आणि पक्षातील ज्येष्ठत्व या मुद्द्यांवर त्यांच्या नावाचा गांभीर्याने विचार होण्याची दाट शक्यता आहे.
विशाखा मोहोड नव्या नेतृत्वाचा चेहरा-
दुसरीकडे, विशाखा मोहोड या नव्या नेतृत्वाचा चेहरा म्हणून पुढे येत असून, पक्षातील युवा आणि महिला प्रतिनिधित्वाचा तोल साधण्याच्या दृष्टीने त्यांचे नावही महत्त्वाचे मानले जात आहे.
महानगरपालिका निवडणुकीत भाजपने १०२ जागा जिंकत निर्विवाद बहुमत मिळवले असल्याने महापौरपदाचा निर्णय पूर्णतः भाजप नेतृत्वावर अवलंबून आहे. राज्यात आणि नागपूर शहरातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच भूमिका निर्णायक ठरणार असल्याने, अंतिम निर्णयाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.









