Published On : Wed, Nov 14th, 2018

‘चालत्या फिरत्या दवाखान्या’चा राज्यपालांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई : लायन ताराचंद बापा हॉस्पिटल आणि संशोधन केंद्राच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या चालत्या फिरत्या दवाखान्याचे आज राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते राजभवन येथे झालेल्या कार्यक्रमात उद्घाटन करण्यात आले.

यावेळी राज्यपाल म्हणाले, या मोबाईल रुग्णालयाच्या माध्यमातून धारावी, कोळीवाडा आणि परिसरातील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना घरपोच आरोग्य सुविधा मिळणार आहे. या उपक्रमाबद्दल ताराचंद बापा रुग्णालयाच्या संचालकांचे अभिनंदन करतो. 23 सप्टेंबर रोजी संपूर्ण देशभर आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय शुभारंभ सोहळ्यास मी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होतो. ही योजना सर्वांसाठी आरोग्य या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी उपयुक्त ठरणार आहे. चालत्या फिरत्‍या दवाखान्याच्या माध्यमातून समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळेल, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

राज्यातील खासगी तसेच धर्मादाय रुग्णालयांनी देखील अशा प्रकारे मोबाईल रुग्णालय सुरु करुन सामान्य नागरिकांना तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना घरपोच आरोग्य सेवा मिळेल, या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले. 1990 मध्ये आमदार असताना अशाच प्रकारे चालते फिरते रुग्णालय आईच्या स्मृतीप्रित्यर्थ सुरु केले होते आणि अशा प्रकारचा प्रयोग करीमनगर जिल्ह्यात पहिल्यांदाच झाल्याची आठवण राज्यपालांनी यावेळी सांगितली.

राज्यपालांच्या हस्ते फित कापून चालत्या फिरत्या रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. मुंबईचे माजी शेरीफ डॉ. अशोक मेहता यांनी प्रास्तविक केले. या चालत्या फिरत्या रुग्णालयामध्ये फार्मासिस्ट, डॉक्टर, पॅथॉलॉजिस्ट आणि इसीजी तंत्रज्ञ यांचा समावेश आहे. झोपडपट्टीतील रहिवाशांसाठी या रुग्णालयाच्या माध्यमातून मोफत आरोग्य सुविधा दिली जाणार असल्याचे डॉ. मेहता यांनी सांगितले. ताराचंद बापा रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. भारत पाठक यांनी आभार मानले. यावेळी लायन्स क्लब ऑफ सायनचे पदाधिकारी उपस्थित होते.