महालक्ष्मी वेलफेयर सोसायटी नागपूर तर्फे स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. सुप्रसिद्ध गायिका व सारेगामा फेम पार्वती नायर, पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे, किरण गडकरी यांच्या शुभहस्ते अभ्यंकर नगर पटांगणात वृक्षारोपण करीत या अभियानाला सुरुवात झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष केतन ठाकरे यांच्पासह मोठ्या संख्येने नागरीक व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी केतन ठाकरे म्हणाले, “वृक्षारोपणाचे हे अभियान केवळ एक कार्यक्रम न रहाता चळवळ व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. समाजातील सर्व स्तरातील लोकांना व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन हे अभियान आम्ही पुढे नेऊ, केवळ वृक्षारोपणच नव्हे तर वृक्षसंवर्धनासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व प्रयत्न आम्ही करणार आहोत”
महालक्ष्मी वेलफेयर सोसायटीच्या माध्यमातून यंदाच्या वर्षी सिरम, आंबा, आवळा, बकुळ, वड, अशोका, कडुनिंब, कदंब, जांभूळ, चिकू, पिंपळ, वड, आरोळा ही झाडे लावण्यात येणार आहेत. या सर्व झाडांची उंची 8 ते 10 फूट असेल शिवाय झाडांचे रक्षण करण्याकरिता पाईपचे ट्री गार्ड लावण्यात येणार आहे. वृक्षारोपणानंतर या झाडांची काळजी घेण्यासाठी स्थानिक नागरिकांवर जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. या झाडांना आवश्यक पाणी मिळेल व ती मोठी होतील याची काळजी घेण्यासाठी संस्थेने प्रतिनिधी नेमले आहेत.
नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे होत असतांना शहरातील हरीत पट्टा झपाट्याने कमी होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर शहराला हिरवेगार शहर ही जुनी ओळख पुन्हा प्राप्त करुन देण्यासाठी महालक्ष्मी वेलफेयर सोसायटीने हे अभियान हाती घेतले आहे. नागपुरातील विविध पर्यावरणवादी संस्था, सामाजिक संस्था, महिला मंडळे, ज्येष्ठ नागरीक मंडळे, क्रीडा संस्था, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांना या उपक्रमात सहभागी करुन घेतले जाईल. विविध वसाहतींमध्ये स्थानिक नागरिकांना सहभागी करुन त्यांच्या माध्यमातून वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचा संकल्प करण्यात आला आहे. या अभियानाच्या दुसर्या टप्प्यात शाळा व महाविद्यालयांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सीड बाॅल तयार करण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन करण्याचा संस्थेचा मानस आहे.