Published On : Mon, Aug 17th, 2020

जिल्ह्यात “जागर अस्मितेचा” मोहिमेचा शुभारंभ

नागपूर : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या अस्मिता प्लस या योजनेच्या माध्यमातून “जागर अस्मितेचा” या मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे यांच्या हस्ते सॅनेटरी नॅपकिनचे वाटप करून करण्यात आले.

यावेळी जि. प. उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, सभापती उज्ज्वला बोढारे, भारती पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमल किशोर फुटाणे, प्रकल्प संचालक विवेक इलमे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. तसेच संपूर्ण नागपूर जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमध्ये मोहिमेचा शुभारंभ आज करण्यात आला आहे.

ग्रामीण भागातील महिला आजही मोठ्या प्रमाणात मासिक पाळीच्या काळात कापडाचा वापर करतात. त्यांना त्यामुळे अनेक आरोग्याशी संबंधित व्याधी जडतात. मासिक पाळीच्या काळात अस्मिता प्लस सारख्या उत्तम गुणवत्ता असलेल्या सॅनेटरी नॅपकिनचा वापर केल्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होणार नाही. तसेच मानसिक स्वास्थ देखील चांगले राहील. शिवाय आपण आपल्या जबाबदाऱ्या अधिक सक्षमपणे निभावू असे मत जिल्हा स्तरावर मोहिमेच्या उदघाटन प्रसंगी श्रीमती बर्वे यांनी व्यक्त केले.


उमेद अभियानाच्या महत्त्वाकांक्षी उद्देशानुसार मासिक पाळीच्या काळात सर्व महिलांनी तसेच किशोरवयीन मुलींनी सॅनेटरी नॅपकिनचा वापर करावा. तसेच आपण इतरत्र कापडाचा वापर करीत असल्यामुळे आरोग्याचा धोका वाढत असून तो टाळावा. अस्मिता प्लस या सॅनेटरी नॅपकिनचा वापर करून आपण आपल्या आरोग्याची सुरक्षितता ठेवू शकतात. त्यामुळे स्वातंत्र्यदिनापासून ते 31 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्याभरात “जागर अस्मितेचा” ही मोहीम राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील महिलांना सॅनेटरी नॅपकिनच्या वापराविषयी जनजागृती या पंधरवाड्यात केली जाणार आहे.

अस्मिता योजनेमुळे ग्रामीण महिलांना शाश्वत उपजिविका मिळणार असून शासनाच्या धोरणाला चालना मिळणार आहे. तसेच अस्मिता प्लसचे सॅनेटरी पॅड सर्वसामान्य महिला व किशोरवयीन मुलींना फक्त 24 रुपयाला आठ पॅडचे पाकीट घेता येईल. तर शाळेतील विद्यार्थिनींना हेच पाकीट फक्त 5 रुपयाला विकत घेता येईल. खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातील उमेद अभियानाच्या महिला स्वयं सहाय्यता समूहातील नोंदणीकृत समूहाला संपर्क करावा, असे आवाहन प्रकल्प संचालक विवेक ईलमे यांनी केले आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.