Published On : Sun, Sep 13th, 2020

स्वर्गीय अनिल कुमार स्मृती पुरस्कार हा पत्रकारितेतील सातत्य आणि समर्पणाची नोंद – पालकमंत्री डॉ.नितीन राऊत

Advertisement

पत्रकार गजानन निमदेव व विकास झाडे यांचा सत्कार

नागपूर : स्वर्गीय अनिलकुमार स्मृतीत दिला जाणारा पुरस्कार हा पत्रकारितेतील सातत्य, सचोटी आणि समर्पणाची कायम नोंद राहिली आहे. यावर्षीचा पुरस्कार देखील अशाच पत्रकारितेला समर्पित व्यक्तिमत्त्वांना दिल्याचा आनंद असल्याचे, प्रतिपादन राज्याचे ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केले.

नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि विदर्भ गौरव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक तरुण भारतचे संपादक गजानन निमदेव तथा लोकमतचे नवी दिल्ली येथील निवासी संपादक विकास झाडे यांना आज प्रदान करण्यात आला.

या पुरस्कार समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक,महामार्ग, सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरिष गांधी, पत्रकार प्रदीप मैत्र, शिरीष बोरकर, ब्रम्हा शंकर त्रिपाठी उपस्थित होते. प्रेस क्लब येथे आज सपन्न झालेल्या सोहळ्याला पत्रकारिता, सामाजिक क्षेत्रातील नामवंत उपस्थित होते.

पत्रकारितेच्या क्षेत्रांमध्ये आपले अतुलनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांना गेल्या पाच दशकांपासून हा सन्मान दिला जातो. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे गिरीश गांधी यांनी केले. कोरोना सारख्या जागतिक संकटाच्या काळात गेल्या काही दिवसात स्वर्गवासी झालेल्या पत्रकारांना कार्यक्रमात श्रद्धांजली व्यक्त करण्यात आली.

पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी यावेळी आपल्या लेखणीतून समाजाला दिशा दाखविणाऱ्या दिग्गजांचा हा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. दिवंगत अनिल कुमार यांच्यासारख्या व्यासंगी पत्रकारांच्या नावाने हा सन्मान प्रेरणादायी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्राचा विरोध पत्करून समाजाच्या भल्यासाठी काम करीत असतो. गजानन निमदेव आणि विकास झाडे यांनी गेल्या २५-३० वर्षात केलेल्या पत्रकारितेचा आढावाही त्यांनी आपल्या भाषणामध्ये घेतला. वेगवेगळ्या विचारसरणीसाठी काम करत असताना देखील, सातत्य व सचोटीने पत्रकारिता केलेल्या दोघांचा सत्कार करताना आपल्याला आनंद होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले. दोन्ही पत्रकाराच्या कार्याचा गौरव केला. गजानन निमदेव व विकास झाडे यांच्या वृत्तपत्र क्षेत्रातील योगदानाचा त्यांनी उल्लेख केला. आजचा सत्कार हा रचनात्मक पत्रकारितेचा सन्मान आहे. विचारांची कटिबद्धता व त्यासाठी कोणत्याही किंमतीला चुकवण्याची ताकत फक्त पत्रकारितेत आहे, असे त्यांनी यावेळी नमूद केले. नुकतेच निधन झालेले तरुण भारतचे संपादक मामासाहेब घुमरे तसेच हरीश अडयाळकर यांना श्रध्दांजली व्यक्त करताना विशेष नामोल्लेख त्यांनी केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब्रम्हा शंकर त्रिपाठी यांनी केले. तर दोन्ही पत्रकारांच्या कार्याची ओळख शिरीष बोरकर यांनी करून दिली. यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी देखील संबोधित केले.